फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तापी परिसर विद्या मंडळ,संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर येथील कै. दामोदर चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीचा विद्यार्थी पराग गजानन जावळे याची महाराष्ट्र पोलीस दलात, पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
त्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. आर. चौधरी यांच्या हस्ते पराग जावळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रबोधिनीचे समन्वयक, मानसशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एस. व्ही. जाधव , सदस्य डॉ सागर धनगर, प्रा शुभांगी पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. कै.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून रावेर व यावल तालुक्यातील ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 1961 साली धनाजी नाना महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
कालांतराने परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे ही बाब लक्षात आल्यावर स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी त्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतुन एक लाख रुपये देनगी देवून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा ठराविक रक्कम देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले या आवाहनाला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने कै.दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीची स्थापना झाली, प्रबोधिनीच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या व परिसरातील इतर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन व संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात, आज पर्यंत दोन पी.एस.आय. व दहा विद्यार्थ्यांची इतर क्षेत्रात कनिष्ठ अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
नुकताच 2019 च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीचा निकाल जाहीर झाला. त्यात सूनोदा येथील रहिवासी, गजानन जावळे यांचे चिरंजीव पराग जावळे यांची महाराष्ट्र पोलीस दलात पी.एस.आय. पदी निवड करण्यात आली. यासोबतच जयेश भावसार याची मुम्बई पोलिस पदी निवड झाली.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर चौधरी यांनी आवाहन केले की परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रबोधनितील उपलब्ध सोयी- सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा आणि जीवनातील विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवावे, तसेच प्रबोधिनीचे समनव्यक डॉ.एस.व्ही जाधव यांनी ही प्रबोधिनीतील ग्रंथ अद्ययावत करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी उमेदवारांचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. प्रसंगी प्रबोधिनीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.