नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । आज सकाळी शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. तथापि, वाढत्या विक्रीच्या दबावामुळे घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारानुरुप भारतीय शेअर मार्केटमधील परिस्थितीही जैसे थेच असल्याचं चित्र दिसत आहे. बुधवारी अमेरिकी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर स्टॉक फ्यूचर्समध्ये थोडी सुधारणा पहायला मिळाली होती. दुसरीकडे आज आशियाई मार्केटमध्ये संमिश्र ट्रेंड पहायला मिळत आहेत.
मार्केट सुरु होताच सेन्सेक्स ४०० अंकांनी कोसळल्याचं निदर्शनास आलं. दिवसाचा कारभार सुरु झाला तेव्हा कालच्या तुलनेत आज शेअर बाजार ४०० अंकांनी खाली म्हणजेच ५७,१९०,०५ वर सुरु झाला तर निफ्टीही १५०.७ अंकांनी घसरण पहायला मिळाली. निफ्टी आज दिवसाच्या सुरुवातीला १७०९४.९५ वर राहिला. बुधवारी सेन्सेक्स ३०४ अंकांनी घसरून ५७,६८५ वर बंद झाला होता. तर निफ्टी ७० अंकांनी घसरून १७,२४६ वर बंद झाला होता.
बुधवारी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेली वाढ आणि सध्याच्या पातळीपेक्षा महागाई आणखी वाढण्याची भीती असल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्याप्रमाणात विक्रीला प्राधान्य दिल्याने शेअर बाजार कोसळले. हाच विक्रीचा ट्रेण्ड आज म्हणजेच गुरुवारीही (२४ मार्च २०२२ रोजी) दिसत असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात घसरण झाल्याचं चित्र पहायला मिळालं.