पाचोरा – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील २८ वर्षीय विवाहित महिला तालुक्यातील लोहटार येथून बेपत्ता झाली आहे.
शुकवार, दि.४ फेब्रुवारी २०२२ पासून बेपत्ता असल्याची खबर महिलेचे वडील दिलीप मोहन परदेशी यांनी मंगळवार, दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दिली असून या खबरीवरुन संबंधित महिला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
एका बाजूला महिला बेपत्ता होऊन एक महिना उलटला तरीही महिलेचा शोध लागत नसल्याने कुटुंब चिंतेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, “लोहटार येथील दिलीप मोहन परदेशी यांची मुलगी खुशी उर्फ (सुवर्णा) हिचा विवाह पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील रवींद्र बुधेसिंग परदेशी यांचे सोबत समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे झालेला आहे. खुशी व रवींद्र यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर वंश व हर्षल या मुलांच्या रुपाने दोन चिमुकली फुले फुलली आहेत. रवींद्र हा मोलमजुरी करुन आपल्या संसाराचा गाडा ओढत आहे.
यातच खुशी हिला काही दिवस लोहटार येथे माहेरी जायचे होते म्हणून एस.टी. सेवा बंद असल्याकारणाने खुशीचा पती रवींद्र याने स्वत:च्या दुचाकीवरून खुशीला गुरुवार, दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी लोहटार येथे पोहचते करून रवींद्र डांभुर्णी येथे आपल्या घरी परतला होता. शुक्रवारी दि.४ फेब्रुवारी २०२२ रोजी लोहटारहून निघालेली खुशी डांभुर्णी येथे आली आहे का ? अशी विचारणा माहेरच्या मंडळीकरून सासरी विचारणा करण्यात आली. खुशी लोहटार येथून बेपत्ता झाली व ती सासरवाडीलाही नसल्याचे माहीत झाल्यावर माहेरच्या व सासरच्या लोकांनी खुशीचा शोध घेण्यासाठी गावोगावी जाऊन व नातलगांना फोन करुन तपास केला मात्र खुशीचा तपास लागला नाही.
त्यामुळे मंगळवार, दि.८ फेब्रुवारी २०२२ रोजी खुशीचे वडील दिलीप मोहन परदेशी यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला खुशी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. खुशी ही मागील एक महिन्यापासून लोहटार येथून बेपत्ता झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. अद्यापही थांगपत्ता लागला नसल्याने खुशीच्या माहेरची व सासरची मंडळी हवालदिल झाली असून आपपल्या परीने खुशीचा शोध घेत आहेत.”
फोटोतील संबंधित महिला कुठेही आढळून आल्यास पाचोरा पोलीस स्टेशन किंवा ७८२३० ३५०८० या क्रमांकावर कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.