मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारच्या गृह विभागातर्फे आधी राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून आता लवकरच अलीकडेच घोषणा केल्यानुसार सुमारे सात हजार पोलीस कॉन्स्टेबल पदांची भरती सुरू करण्यात येणार आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या आठवड्यातच राज्यामध्ये सुमारे सात हजार पोलीस शिपायांची भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याचे घोषीत केले होते. या पार्श्वभूमिवर, २०१९ मधील पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यात निवड झालेल्या ५२९७ उमेदवारांच्या प्रशिक्षणाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जूनी पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानं आता ७२३१ पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, नवीन भरती ही नव्या नियमानुसार करण्यात येणार आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्यानं स्वत: पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार आहे.