चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील धानोरा येथील पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यामुळे येथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
चोपडा तालुक्यातील धानोरा हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असून येथील पाणी पुरवठा योजना ही कधीपासूनच प्रलंबीत होती. यामुळे येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई जाणवत होती. या पार्श्वभूमिवर, आता जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १५ कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या नळ पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी धानोरा गावासाठी १५ कोटी ८९ लाख ५० हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करत त्याची प्रशासकीय मान्यता आमदार लताताई सोनवणे सोनवणे यांना दिली. यात तापी नदीवर जॅकवेल, गावात जलशुद्धीकरण केंद्र, नवीन जलकुंभ, जुन्या जलकुंभाचे नूतनीकरण, सर्व पाइपलाइन नवीन होणार आहे. यामुळे येथील ग्रामस्थांना लवकरच नियमीत पाणी पुरवठा होणार आहे.
ही पाणी पुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी आमदार लताताई सोनवणे यांनी रावेर लोकसभा मतदार संघाचे सहसंपर्क प्रमुख व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या सहकार्याने पाठपुरावा केल्याने आता हे काम मार्गी लागणार आहे.