भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ ते देवळालीच्या दरम्यान मेमू रेल्वे सुरू होण्याची शक्यता असतांनाच आता याच प्रकारातील रेल्वे गाडी भुसावळ ते इगतपुरीच्या Bhusawal To Igatpuri दरम्यान धावणार आहे.
कोरोनामुळे २०२० सालच्या मार्च अखेरीस बंद करण्यात आलेल्या काही रेल्वे गाड्या अद्याप देखील सुरू झालेल्या नाहीत. यात भुसावळ ते देवळाली शटल सेवेचे समावेश आहे. या मार्गावरील अनेक लहान-सहान खेड्यांना जोडणारी ही गाडी दररोज हजारो प्रवाशांसाठी उपयुक्त अशी होती. मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने बर्याचशा रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी मात्र भुसावळ ते देवळाली पॅसेंजर सुरू न करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. यामुळे ही रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. ( Bhusawal To Igatpuri Railway Train )
दरम्यान, रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार भुसावळ ते देवळालीच्या दरम्यान पॅसेंजर सुरू करण्याऐवजी या मार्गावर मेमू रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होती. तथापि, भुसावळ-देवळाली शटल सुरू करण्याऐवजी आता रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी १० जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार असून याबाबत रेल्वे प्रशासनाने अधिकृतरित्या माहिती जारी केली आहे.
भुसावळ- इगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटून इगतपुरीला दुपारी तीनला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी इगतपुरी येथून सकाळी ९.१५ वाजता निघून भुसावळ स्थानकावर ही गाडी सायंकाळी ५.१० वाजता पोहोचेल.