मुंबई प्रतिनिधी | काळजी घेतल्यास कोरोनावर मात करता येणार असली तरी तिसर्या लाटेत सुमारे ८० लाख लोकांना याचा संसर्ग होण्याची भिती असून यासाठी उपाययोजना आखण्यात येत असल्याची माहिती आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमिवर राजेश टोपे म्हणाले, पहिल्या लाटेत वीस लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. दुसर्या लाटेत ४० लाख लोक कोरोनाबाधित झाले, दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यात जवळपास ८० लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसर्या लाटेविरोधात लढण्यासाठी मनुष्यबळाची खूप गरज आहे. परंतु, सध्या केंद्राने फक्त आयसीयुसाठीच लागणार्या मनुष्यबळाला मान्यता दिली आहे. कोवीड सेंटरसह इतर कामांसाठीही मुनषबळ उपलब्ध करून द्यावे. त्याबरोबरच राष्ट्रीय आरोग्य अभियानाला केंद्राने परवानगी दिलेली नाही. केंद्राने याला मान्यता दिली पाहिजे असे ते म्हणाले.
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे औषधांची उपलब्धता खूप गरजेची बाब आहे. केंद्राकडे त्यासाठी मागणी केली आहे. केंद्राने लवकरात लवकर औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा. त्याबरोबरच लॉकडाऊन आणि कोरोनाचे निर्बंध देशभर कसे असावेत? याची केंद्राने एक नियमावली तयार करून द्यायला हवी. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबतही तिसर्या लाटेच्या आनुषंगाने अनेक मागण्या केल्या आहेत. लवकरच तेही आमच्या मागण्या मान्य करतील असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले.