पहूर, ता.जामनेर | इंग्रजी भाषेच्या शब्द संपत्तीत वाढ होण्यासाठी पहूर येथील शाळेत ‘भाषा समृद्धीत शाब्दिक खेळांचे महत्त्वाचे योगदान’ हा वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
पहूर येथील शंकर भामेरे यांनी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षण शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.सुहास पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जळगाव जिल्ह्यातील पहूर गावातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेच्या शब्दसंपत्तीवर भाषिक खेळांच्या परिणामकारकतेचा अभ्यास ‘ या विषयावर लघु संशोधन करीत आहेत.
या संशोधनांतर्गत त्यांनी पहूर येथील आर.टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि आर.बी.आर.कन्या विद्यालय या शाळांमधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना पूर्वचाचणी दिली. त्यानंतर या शाळांमध्ये शब्द साखळी, शब्द मनोरे, शब्द कोडी, शब्द कुंभ यासारखे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग लाभला. उपक्रम राबविल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा उत्तर चाचणी देण्यात आली. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी यांच्या आधारे तुलना केली असता विद्यार्थ्यांच्या भाषिक शब्दसंपत्तीमध्ये सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले .
त्यांच्या या उपक्रमाबद्दल शिक्षण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ .उज्वला भडंगे , गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांनी अभिनंदन केले. उपक्रम यशस्वीतेसाठी आर.टी.लेले हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.बी.पाटील, पर्यवेक्षक एस.व्ही.पाटील, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. व्ही. घोंगडे, पर्यवेक्षिका के.ए .बनकर, उपक्रमशील शिक्षक हरी राऊत आर.बी.आर. कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन, संजय वाघमारे, नारायण खर्बे, इरफान इनामदार, सोपान घोंगडे, प्रकाश जोशी, सुनिल पवार, गौरव शेलवडकर आदींचे सहकार्य लाभले.