बोदवड प्रतिनिधी | निवेदन देऊनही विद्यार्थ्यांना प्रवासाची सोय न झाल्यामुळे बोदवड तहसीलसमोर रस्ता विद्यार्थी व पालकानी रास्ता रोको आंदोलन केले.
याविषयीची अधिक माहिती अशी की, गेल्या दीड महिन्यापासून एसटीच्या संपामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे, त्यातच शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास भाडेसाठी खिशात पैसे नाही, खाजगी रिक्षाचे भाडे महागल्यामुळे शाळेचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर वराड बुद्रुक येथील सामजिक कार्यकर्ते गणेश पाटील व शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष गजानन बेलदार यांचे अध्यक्षतेखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार असणाऱ्या अज्ञातांवर फौजदारी गुन्हे दाखल करा विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची व्यवस्था करा. विद्यार्थ्यांच्या पालकांना एक महिन्याचा जास्त भाडे खर्च झाला त्याची भरपाई द्या. शिक्षण देत नसाल तर अधिकारी राजकारणी यांचे घरी साफसफाई करण्याचे विद्यार्थ्यांना काम द्या. आदी मागण्यांचे निवेदन गावांतून विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आले आहे.
यावर सोमवारपर्यत निर्णय न झाल्याने सोमवार, दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बोदवड तहसील कार्यालयासमोर विद्यार्थी तथा पालकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. मात्र यावर प्रशासनाने काहीही निर्णय न घेतल्याने विद्यार्थी, पालक व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी सुमारे एक ते दीड तास तहसील कार्यालय बोदवडसमोर वाहतूकीची कोंडी झाली होती.
प्रभारी पोलीस निरीक्षक जी एल पडघन यांनी आंदोलकांना तोंडी आश्वासन देऊन आपण सर्व जण बसून मार्ग काढू. वाहतूक सुरळीत करण्यास सहकार्य करा अशी विनंती केली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र या प्रश्नावर शासन नेमकी काय उपाययोजना करते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.