वीर जवान मंगलसिंग परदेशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार

पाचोरा नंदू शेलकर । पाचोरा तालुक्याचे सुपुत्र तथा सावखेडा बुद्रुक येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय-३५) हे पंजाब राज्यातील पठाणकोट येथे शनिवारी मध्यरात्री देशसेवा बजावीतत असतांना अतिरेक्यांच्या हल्ल्यात दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. आज मंगळवारी वीर जवान मंगलसिंग परदेशी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

 

 

 

वीर जवान जवान मंगलसिंग परदेशी हे दसऱ्यानिमित्त एक महिन्यासाठी घरी आपल्या कुटुंबासह सुटीवर आले होते. त्यानंतर ते देशसेवेसाठी पठाणकोट येथे हजर झाले होते. मंगलसिंग परदेशी यांची शहीद झाल्याची वार्ता सावखेडा बुद्रुक गावात पोहचताच एकच शोककळा पसरली होती. तर परदेशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या पश्चात वृध्द आई वडील, दोन भावंडांसह पत्नी किरण, मुलगा चंदन,  चंचल, कांचन या दोन मुली असा परिवार आहे.

 

शहिद मंगलसिंग राजपूत यांचे पार्थीव मंगळवारी १६ नाव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर तेथुन मिलट्रीच्या वाहनातून सावखेडा बुद्रुक या गावी आणण्यात आले. गावातून लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. ‘अमर रहे अमर रहे मंगलसिंग राजपूत अमर रहे, भारत माता की जय,’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली. शहीद मंगलसिंग परदेशी यांचा मुलगा चंदन यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.

 

आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रांत बांदल, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील), जिल्हा सैनिकी अधिकारी कार्यालयाचे ए. बी. काकडे, पठाणकोट येथुन सोबत आलेले हवालदार अमर माने, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जिल्हा महिला अध्यक्षा वंदना चौधरी, परदेशी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, रावसाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांच्यासह लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content