जल जीवन मिशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पाणी हेच आमचे मिशन : ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरात पिण्याचे शुध्द पाणी पोहचवण्याचा संकल्प घेतला असून लोकांपर्यंत पाणी पोहचवणे हेच आमचे मिशन असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे आज झालेल्या बैठकीत बोलत होते.

 

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ८३८ गावांमधील पाणी पुरवठा योजनांसाठी तब्बल ९२६ कोटी ७८ लक्ष रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून यातील ७० गावांना तांत्रीक मान्यता मिळालेली आहे. याची प्रशासकीय मान्यता आठवडाभरात मिळणार आहे. तर आणखी १०० गावांचे अंदाजपत्रक तयार असून लवकरच तांत्रीक आणि प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. दरम्यान, ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर झालेल्या आहेत, तेथील सरपंचांशी आज पालकमंत्र्यांनी संवाद साधून त्यांना संबंधीत योजनांच्या यशस्वी कार्यान्वयनासाठी आवश्यक त्या सूचना केल्यात. अचूक नियोजन करून सरपंचानी पाणीपुरवठा योजना यशस्वी करण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवाहन केले. तर सरपंचांच्या समस्या देखील त्यांनी ऐकून घेतल्या.

 

आधीच्या पाणी पुरवठा योजनांमधील सर्व त्रुटी दूर करून केंद्र व राज्य सरकारने जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला घरपोच पाणी देण्याचे नियोजन केले आहे. याच्या अंतर्गत सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी योजनेच जिल्ह्यातील ८३८ गावांसाठी  तब्बल ९२६ कोटी ७८ लक्ष रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्या आहेत. आधीच्या योजना या दरडोई ४० लीटर पाण्याच्या निकषावर आखण्यात आल्या होत्या. तर जलजीवन मिशन ही ५५ लीटर दरडोई या निकषावर अंमलात आली आहे. आधी गुरांना लागणार्‍या पाण्याचा यात विचार करण्यात आला नव्हता. तर जल जीवन मिशनमध्ये याचा पूर्णपणे विचार करण्यात आला आहे. आधीची योजना ही पाणी टाकीपर्यंत पोहचवण्यासाठी अंमलात आल्या होत्या. तर जलजीवन मिशन मध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचे मिशन आखण्यात आले आहे. आधीच्या योजना जलसाठा करणार्‍या टाकीपर्यंत पाणी पोहचवण्यासाठी होत्या. आता जलजीवन मिशनमध्ये प्रत्येक घराला नळजोडणी मिळणार आहे.

 

दरम्यान, जलजीवन मिशनमध्ये पहिल्या टप्प्यात तांत्रीक मंजुरी मिळालेल्या जिल्ह्यातील ७० गावांच्या सरपंचांना आज पालमंत्र्यांनी अजिंठा विश्रामगृहात बैठकीला बोलवले. यात त्यांनी जलजीवन मिशन योजनेच्या यशस्वी कार्यान्वयनासाठी सरपंचांना सूचना दिल्या. यात प्रामुख्याने ना. गुलाबराव पाटील यांनी पाणी पुरवठा योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरपंच आणि ग्रामपंचायतीमधील त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, गावातील गटर, पथदिवे, रस्ते आदी कामांपेक्षा पाणी पुरवठा योजना ही अधिक महत्वाची आणि वेगळी आहे. हे काम प्रदीर्घ काळ टिकणारे असून यात विद्यमान सरपंच आणि त्यांच्या सहकार्‍यांचा लौकीक वाढणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

 

ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पाणी पुरवठा योजना सुरु करण्यापूर्वी पाण्याचा स्त्रोत तपासून घ्या. कारण स्त्रोत हा सर्वात महत्वाचा घटक असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच योजना राबविणार्‍या ग्रामपंचायतीने राष्ट्रीयीकृत बँकेत जल जीवन मिशनसाठी स्वतंत्र खाते उघडून यात कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी लोकवर्गणी जमा करणे आवश्यक आहे. यासोबत जिल्हा परिषदेला आवश्यक असणारी कागदपत्रे, ठराव, टाकीच्या जागा तसेच विहीर यांच्या जागा तात्काळ हस्तांतरित करणे; बुडीत क्षेत्रांमधील विहीर असल्यास त्यासंबंधी प्रस्तावास आवश्यक असणार्‍या कागदपत्रे उपविभागात सादर करणे देखील गरजेचे आहे. पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर पाणी तपासणी करावी, लोकांमध्ये जनजागृती करावी. तसेच अंगणवाडी आणि शाळांना नळ जोडणीत प्राधान्य द्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या. तर योजनांच्या अंमलबजावणीत काहीही अडचण आल्यास पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधा किंवा माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले.

 

दरम्यान, याप्रसंगी उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपस्थित सरपंचांनी ज्या गावांत  स्मशानभूमी बांधकाम झालेले नाही अश्या स्मशानभूमिसाठी प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले. तसेच १६ कलमी कार्यक्रम आणि शोषखड्डयांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगवाडे यांनी केले.  आभार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता निकम  यांनी मानले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे  जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता आणि शाखा अभियंता व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content