चाळीसगाव प्रतिनिधी | बहाळ गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तालुक्यातील भऊर येथील मामा-भाच्याचा मृत्यू झाला असून तिसरा तरूण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील भऊर येथील आकाश भिवसन मोरे (वय १८), अनिल संजय गायकवाड (वय १९) व विनोद विक्रम मोरे (वय १९) हे तिघेही तरुण दुचाकी (एमएच- १९, डिएच- ०१३५)ने रविवारी दुपारी चाळीसगाव येथे गेले होते. यानंतर ते तिघेही रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भऊर गावाकडे निघाले. दरम्यान बहाळ गावापासून जवळच असलेल्या वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात आकाश मोरे व अनिल गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर विनोद मोरे हा तरुण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, अपघातातील मृत आकाश मोरे व अनिल गायकवाड मामा-भाचे होते. अपघातात या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.