बोदवड तालुक्याचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी ५८ कोटींचा ‘डीपीआर’ : आ. चंद्रकांत पाटील

बोदवड प्रतिनिधी | सर्वसामान्यांच्या पाठबळावर आपण आमदार झाले असून तालुक्यातील पाणी प्रश्‍न कायमचा सुटावा म्हणून ५८ कोटी रूपयांचा ‘डीपीआर’ पाठविण्यात आल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. शहरात आयोजीत करण्यात आलेल्या शाखा व तिरंगा चौकाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शिवसेनेची अल्पसंख्यांक शाखेचे उदघाटन करण्यात आले. याच कार्यक्रमात तिरंगा चौकाचे उदघाटन देखील करण्यात आले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझ्या आजवरच्या वाटचालीत सर्वसामान्यांचे प्रेम हे सर्वात महत्वाचे ठरले आहे. बोदवड तालुक्यातूनही आपल्याला भरभरून प्रेम मिळाले असून याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तालुक्यातील विकासकामांना वेग देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने साडेचार कोटी रूपयांची कामे सुरू असून समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून लवकरच निविदा निघणार आहे. यावेळी पटवे बिरादरी शादीखाना सभागृहासाठी ५० लाख रूपये निधी देण्याची घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच बोदवड शहर व तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ५८ कोटी रूपयांचा डीपीआर पाठवल्याचे सांगितले. शेतीसाठी मातोश्री योजनेमधून पाणंद रस्ते देण्याचा प्रयत्न आहे. नगरपंचायतीला नुकतेच दोन कोटींचा निधी दिला. पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या कामांचे भूमिपूजन होईल. बोदवड शहरात लवकरच पाच मोठे हायमास्ट लावणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

याप्रसंगी सईद बागवान, छोटू भोई, अफसर खान, विशाल बलबले, नगरसेवक देवेंद्र खेवलकर, सुनील बोरसे, मुनाफ ठेकेदार, आनंदा पाटील, अस्लम बागवान, धनराज गंगतीरे, जमील बागवान, सलीम कुरेशी, अहमद कुरेशी, हर्षल बडगुजर आदी उपस्थित होते.

Protected Content