जळगाव दिनांक २८ (प्रतिनिधी) : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी राज्य सरकारने भरीव वाढीव मदत जाहीर केली असून या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकर्यांना दिलेला शब्द पाळला आहे. दरम्यान, राज्य शासनाने या मदतीचा जीआर देखील जाहीर केला असून मदती त जळगाव जिल्ह्याचा समावेश झाला असून या अनुषंगाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीची भरपाई ही दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने मिळणार असून कुणीही या संदर्भात पसरवण्यात येणार्या भूल थापांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
राज्य शासनाने दिनांक २६ ऑक्टोबर रोजी नवीन शासन निर्णय जाहीर केला. यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी पाठविलेल्या प्रस्तावांच्या आधारे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून २१ ऑक्टोबर २०२१ च्या निर्णयानुसार वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी तूर्त ७५ टक्के एवढा असा एकूण २ हजार ८६० कोटी ८४ लक्ष ७ हजार निधी वितरीत करण्यात आला. यात नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याचा समावेश नव्हता. या अनुषंगाने बुधवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकर्यांची अतिवृष्टी व पुराने मोठी हानी झाली असून त्यांना दिवाळीआधी वाढीव दरानुसार भरपाई मिळावी अशी मागणी केली. तर दुपारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुध्दा त्यांनी हा प्रश्न आक्रमक भूमिका घेऊन लाऊन धरला. यावर मंत्रीमंडळाने जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना वाढीव दरानुसार नुकसान भरपाई देण्याला मान्यना देऊन या संदर्भात बुधवारी रात्री राज्य सरकारने जीआर जाहीर करून जळगावसह राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी ७७४ कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.
या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना ही रक्कम टप्याटप्याने मिळणार असून या संदर्भात पालकमंत्री म्हणाले की, काही जण जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळणार नसल्याचा अफवा पसरवत होते. मात्र आपण या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शेतकर्यांची व्यथा सांगितली. तर मंत्रीमंडळातही याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारने तातडीने या संदर्भातील निर्णय घेऊन याचा जीआर देखील जाहीर केला आहे. यामुळे आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आभार मानत आहोत. जिल्ह्यात काही जणांनी शेतकर्यांना मदत मिळणार नसल्याची अफवा परवली होती. मात्र असे काही होणार नसून दिवाळीपर्यंत शेतकर्यांना वाढीव दरानुसार टप्प्याटप्प्याने ही मदत मिळणार आहे. आपण आजवर शेतकर्यांसोबत होतो. उद्यादेखील राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.