जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रभारीराज सुरू असून प्र. कुलगुरू ई. वायूनंदन यांनी विद्यापीठ वार्यावर सोडले असल्याचा आरोप करत विद्यापीठ कृती समितीने विद्यापीठावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
विद्यापीठ कृती समितीने एका निवेदनाच्या माध्यमातून आता प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांना टार्गेट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज विद्यापीठ कृती समितीच्या आंदोलनाचा सातवा दिवस असला तरी प्रशासन कोणत्याही प्रकारे निर्णय घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही.
या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, प्रभारी कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांच्या निष्क्रीय भुमिकेमूळे अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. तसेच कुलगुरु डॉ. ई.वायुनंदन हे विद्यापीठात येतच नसल्यामुळे विद्यापीठातील कामे खोळंबली आहेत. व अनेक फाईल्स डॉ.ई.वायुनंदन यांच्या सही अभावी प्रलंबीत आहेत. या मुळे शैक्षणिक क्षेत्रात तीव्र नाराजीचे वातारण निर्माण झाले आहे. विद्यापीठामध्ये सध्या एकही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे विद्यापीठाचे प्रशासन सध्या वार्यावर आहे.
कर्मचार्यांचे आंदोलन शांततेच्या व सनदशीर मार्गाने चालू असतांना विद्यापीठाचे प्रभारी प्र.कुलगुरु डॉ.बी.व्ही.पवार यांना ही विद्यापीठातील आंदोलन सोडवता आलेले नाही. परिणामी प्रभारी राज आपल्या पदांचा गैरवापर करुन विद्यापीठाचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान करीत असल्याने शासनामार्फत तात्काळ प्रशासकाची नियुक्ती करणेबाबत विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन राज्यपाल आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.