शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलकांत कारखाली शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला शेंदुर्णी शहरात १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील शेतकरी आंदोलकांचा शेतकऱ्यांना कार खाली चिरडून जो नरसंहार करण्यात आला त्यात ८ शेतकऱ्यांचे प्राण गेले त्या घटनेचा निषेध म्हणून राज्यातील महाविकास आघाडी मित्र पक्षांतर्फे आज राज्यात बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शेंदूर्णी येथे १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात येत असून येथील सर्व दुकाने, आस्थापना व व्यापारी पेठ बंद आहे त्यामुळे शेंदूर्णीच्या मुख्य रस्त्यावर शुकशुकाट आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी विरोधी ३ काळ्या कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी गेल्या ९ महिन्यापासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करीत असतांना केंद्रीय गृहराज्यमंत्रीच्या मुलाच्या कारने उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर कार घालून त्यांना चिरडून ठार मारले असा आरोप असून सुप्रीम कोर्टाने सक्त कारवाई करण्याचे उत्तर प्रदेश सरकारला आदेश दिले होते.
आरोपी आशिष मिश्राला अटक गेली आहे. या दुर्दैवी घटनेत ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असल्याने घटनेचा संपूर्ण देशात निषेध करण्यात येत असून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा व दोषी आरोपींना कडक शिक्षा मिळावी, म्हणून महाविकास आघाडीतर्फे आज सोमवार ११ ऑक्टोबर २०२१ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. शेंदूर्णी येथिल दुकाने, आस्थापना व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळून मृत शेतकऱ्यांविषयी संवेदना प्रकट करून भरभरून सहकार्य करणाऱ्या जामनेर, शेंदूर्णी, पहुर, नेरी, फत्तेपुर, तोंडापूर, लोहारा सह विधानसभा क्षेत्रातील सर्व व्यापारी संघटना व सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नियोजन मंडळ सदस्य संजय गरुड,शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ मनोहर पाटील,राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील यांनी आभार मानले आहेत.