मुंबई प्रतिनिधी | राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी कॉंग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी कॉंग्रेसनं उमेदवाराची घोषणा केलीय. रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजीव सातव यांच्या निधनानं एक जागा रिक्त झाली होती, त्यांच्या जागेवर आता रजनी पाटील निवडणूक लढवतील. रजनी पाटील ह्या सध्या जम्मू आणि काश्मीरच्या कॉंग्रेस प्रभारी आहेत. त्या आधीही राज्यसभेवर होत्या. लक्षणीय बाब म्हणजे विधान परिषदेसाठीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतही रजनी पाटील यांचं नाव आहे. तो निर्णय अजून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर रजनी पाटील यांना उमेदवारी दिली गेलीय. दरम्यान, भाजपानं राज्यसभेच्या एका जागेची निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. त्यात संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता राज्यसभेच्या जागेसाठी रजनी पाटील आणि संजय उपाध्याय यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कॉंग्रेसनं राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. राजीव सातव यांना कोरोनासंसर्ग झाल्यानं पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, १६ मे रोजी राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. याच जागेवरून आता कॉंग्रेस आणि भाजपमध्ये मुकाबला होणार असल्याचे दिसून आले आहे.