जामनेर प्रतिनिधी | अतिवृष्टीमुळे तालुक्यात मोठी हानी झाली असून काही गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. यातच पावसाचा जोर कायम असल्यामुळे या गावांसाठी रात्र वैर्याची ठरणार असल्याचे दिसून येत आहे. तर अतिवृष्टीत एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, काल रात्रीपासून तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे. विशेष करून मध्यरात्रीच्या सुमारास चक्रीवादळासह मुसळधार पावसाने तालुक्यातील अनेक गावांना झोडपले. आज तोंडापूर येथील खडकी नदीच्या बंधार्यातील पाण्यात शेख मुसा शेख साहीर (वय ३० वर्षे वय) हा तरूण वाहून गेला. त्याला वाचविण्यासाठी पाण्यात दोन जणांनी उड्या मारल्या. मात्र ते त्याला वाचवू शकले नाहीत. तर सुदैवाने हे दोन्ही जण काठावर परत आल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र हा प्रकार अनेकांनी पाहिल्याने त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. तर वाहून गेलेल्या तरूणाचा सायंकाळपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही.
दुपारी काही गावांमध्ये पावसाने विश्रांती घेतली. मात्र सायंकाळपासून बहुतांश ठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मुसळधार वृष्टीमुळे सामरोद, ओझर, टाकरखेडा आदी गावांचा जगाशी असणारा संपर्क तुटला आहे. फत्तेपूर ते तळेगावच्या दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे. तर जामनेर आणि भुसावळच्या दरम्यान असणार्या पुलाखालील पाण्याची पातळी देखील लक्षणीररित्या वाढलेली आहे. जर रात्रीतून पाऊस वाढला तर या मार्गावरील वाहतुकीचा देखील खोळंबा होऊ शकतो.
दरम्यान, अतिवृष्टी होत असतांना कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिली आहे.