पाचोरा नंदू शेलकर । तालुक्यातील लासुरे येथील शेतकऱ्याच्या शेतातील २ हेक्टर ९४ आर पैकी साडेतीन एकरवरील उभी कपाशीचे झाडे अज्ञात इसमांनी उपटून फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पिडीत शेतकऱ्याने पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसात दोन संशयितांना विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील शेतकरी भैय्यासाहेब दयाराम पाटील यांची सावखेडा बु” शिवारात गट क्रं. १०२ वर २ हेक्टर ९४ आर शेतजमीन आहे. या क्षेत्रावर भैय्यासाहेब पाटील यांनी कपाशीची लागवड केली आहे. परिसरात चांगल्याप्रकारे पाऊस झाल्याने कपाशीचे पिक दमदार होते. असे असतांनाच अंधाराचा फायदा घेत अज्ञात इसमांनी त्यांचे शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावरील कपाशीची झाडे उपटून फेकल्याने “होत्या चे नव्हते” झाले. भैय्यासाहेब पाटील यांना या साडेतीन एकर कपाशीच्या पिकापासुन सुमारे तीन लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र त्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अज्ञात इसमांनी हिरावून घेतला आहे.
सदरचा प्रकार भैय्यासाहेब पाटील यांचे चिरंजीव आज दुपारी १२ वाजता शेतात गेले असता त्यांचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ वडीलांना घटनेची माहिती दिली असता भैय्यासाहेब पाटील यांनी शेतात धाव घेत सदरचा घडलेला प्रकार पाहिला. व झालेल्या घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसात दोन संशयितां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसात दोन संशयितां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय माळी हे करीत आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/526479905110257