पाचोरा, नंदू शेलकर | भरधाव वेगाने धावणारी बस आणि तिला टक्कर झालेली दुचाकी यातील अपघात टाळण्यासाठी बसच्या ड्रायव्हरने प्रयत्नांची शर्थ करत मातीच्या ढिगार्यावर बस थांबविल्याने यातील स्वार असलेल्या २८ प्रवाशांचे प्राण वाचले. तर, या अपघातात दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अत्यंत चित्तथरारक अशी ही घटना आज पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली फाट्याजवळ घडला.
याबाबत वृत्त असे की, पाचोरा येथील निर्मल सिड्स जवळील अंतुर्ली फाट्याजवळ नाशिक आगाराच्या बसचा व प्लॉटिना मोटार सायकलचा समोसमोर अपघात झाला. अपघातात मोटार सायकल वरील दोन महिलांसह तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांची तब्येत अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी जळगांव येथे हलविण्यात आले आहे. वाहकाने प्रसंगावधान राखत एस. टी. बस साईटला नेण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या कडेला मातीचा मोठा ढिगार असल्याने बसचा मागील भाग व चार चाके ढिगार्यात अडकली, बस ढिगार्यात अडकली नसती तर पल्टी होऊन २० फुट खड्यात जावून मोठी जीवितहानी झाली असती. बसमध्ये २८ प्रवाशी पाचोरा येथून विविध ठिकाणी प्रवासास निघाले होते. बसचा अपघात झाल्यानंतर त्या प्रवाशांना पाचोरा आगाराच्या वेगवेगळ्या बसमध्ये त्याच मार्गाने जाणार्या बसमधून पाठविण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच बस चालक स्वत: हून पाचोरा पोलिस ठाण्यात तर महिला वाहक पाचोरा आगारात जमा झाले. घटनास्थळी आगार प्रमुख निलीमा बागुल, वाहक अधिक्षक सागर फिरके, लिपिक संदिप पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, सहाय्यक फौजदार हंसराज मोरे, हवालदार विजयसींग पाटील, बापू महाजन, नरेंद्र नरवाडे यांनी भेट दिली. पाचोरा पोलीस ठाण्यात वाहकाच्या तक्रारीमुळे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात माहिती अशी की, आज सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान पिंपळगाव बसवंत आगाराचे चालक जितेंद्र नामदेव कुंभार, वाहक श्रीमती एन. एस. शिंदे हे एम. एच. १४ बी. टी. ४७१४ ही बस पाचोरा आगारातून नाशिक येथे जाण्यासाठी निघाली होती. बस वेगाने अंतुर्ली फाट्या जवळून भडगाव कडे जात होती. दरम्यान अंतुर्ली खु ता. पाचोरा येथून प्लॉटिना सी. टी. १००, एम. एच. १९ सी. डी. ७५९३ ह्या मोटारसायकल वर मुळचे नांदगाव (ता. सोयगाव) येथील रहिवासी असलेले अशोक खंडू पगारे (वय – ५५ वर्ष), कोकीळाबाई अशोक पगारे (वय – ४५ वर्षं) रा. दोन्ही नांदगाव ता. सोयगाव व रत्ना ज्ञानेश्वर निकम (रा. अंतुर्ली खु ता. पाचोरा) हे अंतुर्ली येथून पाचोरा शहराकडे जाण्यासाठी निघाले होते.
अंतुर्ली फाट्याजवळ आपण बसला धडकले जावू ह्या भितीने मोटारसायकल स्वार अशोक पगारे यांनी मोटारसायकल घाईघाईने डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला मात्र बसचा वेग अतिशय जास्त असल्याने ते बसवर जावून धडकले. तर बस चालक जितेंद्र कुंभार यांनी प्रसंगावधान राखत ३० फुट अंतरावरून ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. वाहक चालकाने अर्जंट ब्रेक लावल्याने तीस फुटांपर्यंत टायर घासण्याच्या खुणा उमटल्या आहेत. मात्र बस एका साईडला नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर रस्त्याचे कडेला मातीचा मोठा ढिग असल्याने अर्धी बस ढिगार्यात तर बसचा काही भाग २० फुट असलेल्या खोल दरीच्या भागावर तरंगला. बस मातीच्या ढिगार्यात अडकल्याने बस चालक, वाहक व २८ प्रवाशांना जराही खरचटले नाही. अपघात होत असल्याचे पाहूनही चालकाने प्रसंगावधान राखल्याने आज प्रवाशांसह वाहक आणि चालकाचे प्राण वाचल्याचे दिसून आले. मात्र या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अशोक सांडू पगारे व कोकीळाबाई अशोक पगारे यांची मुलगी रत्ना ज्ञानेश्वर निकम ही अंतुर्ली खु ता. पाचोरा येथे रहात असून रविवारी रक्षाबंधन असल्याने आई व वडील नांदगाव ता. सोयगाव येथून मुलीला भेटायला आले होते. रत्ना निकम ही आशा स्वयंसेविका असल्याने तीला दुसर्या दिवशी पाचोरा येथे रुग्णालयात जावयाचे होते. तर आई – वडीलांना नांदगाव येथे राहत्या घरी जावयाचे असल्याने मुलीला पाचोरा येथे सोडून आपण पुढे नांदगाव येथे जावू या साठी ते तिघेजन मोटारसायकल वर निघाले असताना मोठा अपघात झाला आणि त्यात ते तिघेही गंभीर जखमी झाले. या तिघांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.