आता काटेरी झुडपे, गवत काढणे झाले सोपे ; योगेश बारी यांचे यंत्र

 

पाचोरा, प्रतिनिधी  । आता शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर असे काटरे झुडपे व गवत काढणी यंत्र पाचोरा येथील युवा संशोधक योगेश बारी यांनी बनविले आहे.

     सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण  आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये वाढलेल्या बांधबंधाऱ्यांवरील काटेरी झुडपे व गवत हे डोकेदुखी ठरत आहे. या कामासाठी सहसा मजुरही मिळत नाही. निंदणीसाठी लावलेले मजुर बांध बंधाऱ्यांवरील काटेरी झुडपे व गवत काढण्यास असमर्थता दाखवतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे व गवत वाढुन मशागतीच्या कामासाठी अडथळा होत आहे. 

      पाचोरा शहरातील योगेश बारी या संशोधकाने काटेरी झुडपे व गवत कापणी यंत्र बनविले आहे. हे कापणी यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरणार आहे. या कापणी यंत्राची वैशिष्ट्ये म्हणजे कोणीही व्यक्ती सहजरीत्या हाताळु शकतो. याला शाॅक लागण्याची देखील भिती नाही. हे यंत्र बॅटरीच्या साहाय्याने तसेच फवारणी स्पे पंपाच्या साहाय्याने देखील उपयोगात आणले जावु शकते. हे यंत्र वजनाने हलके व सहजरीत्या हाताळता येणारे आहे. हे कापणी यंत्र बनविण्यासाठी एक इंची पी. व्ही. सी. पाईप, स्टीलचे ब्लेड, हाय पावर १२ व्होल्टची मोटर, आॅन आॅफ स्विच, १२ व्होल्ट व १२ एम्पीयरची बॅटरी, थ्री पिनची वायर (फवारणी स्प्रे पंपास लागणारी) असे साहित्य उपयोगात घेतलेले आहे. यंत्र  बनविण्यासाठी १ हजार ८०० रुपये इतका खर्च लागला असल्याचे योगेश बारी यांनी सांगितले.

 योगेश बारी यांना बालपणापासूनच विविध उपकरणे बनविण्याचा छंद असल्याने ते नियमित वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती करत असतात. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते जिल्ह्यातील पहिले “युवा संशोधक” म्हणुन गौरविण्यात आले होते.

Protected Content