अंजू बॉबी जॉर्जकडून मोदी सरकारला यशाचे श्रेय

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  भारताची माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्जने मोदी सरकारच्या काळात नेमका काय बदल झाला हे सांगत ऑलिम्पिकमधील यशाचे श्रेय मोदी सरकारला दिले  आहे.

 

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत सर्वात उत्तम कामगिरी केली असून एकूण सात पदकांची कमाई केली आहे. याआधी भारताने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदकांवर आपलं नाव कोरलं होतं. मात्र यावेळी भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदक जिंकत इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली.

 

टोक्यो ऑलिम्पिकच्या आधी मोदी सरकारने ज्याप्रकारे खेळाडूंना पाठिंबा दिला त्याचं अंजू बॉबी जॉर्जने कौतुक केलं आहे. २००३च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावून अन्य स्पर्धामध्येही यश संपादन करणाऱ्या माजी ऑलिम्पियन लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने आधीच्या सरकारमध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये नेमका काय फरक आहे यावरही भाष्य केलं.

 

 

सरकार खेळाडूंना खूप प्राथमिकता देत आहे. पदक जिंकल्यानंतर थेट पंतप्रधान त्यांना फोन करत आहेत. कोणालाही ही संधी सोडायची नसावी,” असं तिने म्हटलं आहे. यावेळी तिने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहभागासंबंधीही सांगितलं.

 

“हे पहिल्यांदाच असं होत आहे. आमच्यावेळीही क्रीडामंत्री ऑलिम्पिक विलेजला भेट देत होते. वर्ल्ड चॅम्पिअनशिप जिंकल्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन झालं, पण मंत्रालयाकडून काहीही मोठी गोष्ट झाली नाही. हो…पंतप्रधानांनी (मनमोहन सिंग) माझं अभिनंदन केलं. पण त्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. पण यावेळी खेळाच्या आधीही पंतप्रधान (नरेंद्र मोदी) खेळाडूंना फोन करत आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहेत, त्यांना पाठबळ देत आहेत. भारतात काहीतरी मोठं होत आहे. मी ही मजा आणि संधी गमावत आहे,” अशी खंत अंजू बॉबी जॉर्जने व्यक्त केली आहे.

 

यावेळी किरेन रिजिजू यांच्याकडे क्रीडा खातं नसतानाही ते सक्रीय सहभाग दाखवत असल्यासंबंधी विचारलं असता तिने सांगितलं की, “त्यांचा खूप सहभाग असून ते प्रत्येक खेळाडूला ओळखतात. जेव्हा कधी आम्ही मेसेज किंवा फोन करतो तेव्हा ते उपलब्ध असतात. ते पाठिंबा देण्यासाठी नेहमी तयार असतात. ते नेहमी खेळाडूंना पाठबळ देत असतात. नवे क्रीडा मंत्रीदेखील (अनुराग ठाकूर) क्रीडा पार्श्वभूमी असणारे आहेत. अशा प्रकारचा पाठिंबा आम्ही मंत्रालय आणि सिस्टीमकडून अपेक्षित करत आहोत. त्यामुळे ते आता पदक मिळाल्यानंतर सेलिब्रेट करत आहेत अशातला भाग नाही, ते सुरुवातीपासूनच आहेत”.

 

“ते आमच्या पाठीशी असून पाठिंबा देत आहेत. प्रत्येक खेळाडूला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचाच हा निकाल आहे. खालच्या स्तरापर्यत काम केलं जात आहे. दीर्घकाळासाठी योजना आहे. क्रीडा प्राधिकरण २०२८, २०३० च्या ऑलिम्पिकसाठीही तयारी करत आहे. अशाच प्रकारे सिस्टीम असली पाहिजे,” असं मत अंजू बॉबी जॉर्जने व्यक्त केलं आहे. असाच पाठिंबा मिळत राहिला तर भारत पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.

 

आयएएएफ वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या अंतिम फेरीत दाखल होणारी अंजू बॉबी जॉर्ज भारताची पहिली आणि एकमेव खेळाडू आहे. २००३च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिने लांब उडीत कांस्यपदक पटकावत इतिहास रचला होता. तिने आयएएएफ वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळवलं होतं. २००२ मध्ये तिचा अर्जून पुरस्काराने गौरव करण्यात आला.  मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि २००४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं होतं.

 

Protected Content