सांगली | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाचा संसर्ग कमी असणार्या जिल्ह्यांमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याला परवानगी देणार असल्याची आज येथे घोषणा केली. यामुळे जळगावसह अन्य जिल्ह्यांमधील व्यापार्यांनी दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राज्य सरकार सायंकाळपर्यंत जीआर जारी करणार असून यानंतर जिल्हा प्रशासन याच्याशी सुसंगत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
याबाबत वृत्त असे की, राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी असणार्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील होणार असल्याचे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आधीच केले होते. आज मुख्यमंत्र्यांनी यावर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंतच दुकाने सुरू आहेत. दुपारी ४ पर्यंत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने दुकानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी व्यापारी आणि दुकानदारांकडून होत होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले असता त्यांनी ही माहिती दिली.
राज्यातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यामुळे राज्य शासनाचा निर्णय सायंकाळपर्यंत येणार असून याच्या नंतर जळगावचे जिल्हाधिकारी आदेश जारी करून निर्बंध शिथील करू शकतात.