इस्लामाबाद : वृत्तसंस्था । पाकिस्तानच्या ओकारा येथे ५ लोकांनी एका बकरीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर बकरीचा मृत्यू झाला आहे.
सतगारा पोलीस स्टेशनमध्ये पाच आरोपी नईम, नदीप, रब नवाज आणि अन्य एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बकरीच्या मालकाने या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बकरीला निर्जन ठिकाणी घेऊन गेले होते तेथे त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असे मालकाने सांगितले. बकरीचा शोध घेताना तिचा मालक तेथे पोचल्यावर सर्व आरोपी तेथून पळून गेले असे त्याने पोलिसांना सांगितले.
गुन्हा दाखल केल्यानंतर येथील पोलिसांनी सर्व दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. आता ही घटना उघडकीस आल्यानंतर पाकिस्तानमधील नागरिक रोषाने पेटून उठले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी महिलांवरील अत्याचाराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते आता पुन्हा चर्चेत आले आहेत. लैंगिक शोषण हे अश्लीलतेमुळे होते, जे पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीतून आले आहे असे त्यांनी म्हटले होते. यासह, त्यांनी नकाब घालणे देखील आवश्यक असल्याचे म्हटले होते. आता शेळीसोबत झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर लोकांनी सोशल मीडियावर इम्रान खान यांना त्यांच्या वक्तव्यांवरून टीका करण्यास सुरुवात केली आहे.
सामाजिक कार्यकर्ती शनीरा अक्रमने या घटनेवर व्यक्त होत एक इन्स्टाग्राम पोस्ट टाकली होती. ‘आज एक बकरी, उद्या कोण,?’ असा सवाल तिने आपल्या पोस्टमध्ये केला होता. शनीरा यांनी आपल्या पोस्टमध्ये महिला व मुलांच्या कल्याणासाठी शिक्षणास प्रोत्साहन देण्यावर भर दिला पाहिजे असे म्हटले आहे. अभिनेत्या मथिरानेही या घृणास्पद घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि शोषण टाळण्यासाठी प्राण्यांनीही सैल कपडे घालावेत का असा प्रश्न विचारला आहे.
ट्विटरवरील अनेक युजर्सनी पंतप्रधान इम्रान खान यांना या घटनेच्या आधीच्या त्यांच्या वक्तव्यांची आठवण करून दिली आहे. ज्यात त्यांनी म्हटले होते की महिलांचे कपडे तरुणांमध्ये उत्साह निर्माण करतात. अन्यथा पुरुष तर रोबोट असतात.
पाकिस्तानमध्ये वारंवार महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. याआधी जेव्हा पंतप्रधानांनी महिलांच्या शोषणासंदर्भात असे वक्तव्य केले होते, त्यावेळीसुद्धा लोकांनी त्यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली होती.