पाचोरा प्रतिनिधी । येथील ८४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने कोणत्याही स्वरूपाचे कर्ज घेतलेले नसतांना त्यांच्या सातबारा उताऱ्यावर दोन लाख रुपये कर्जाची नोंद दाखवली. यानंतर उताऱ्यावरील शेतातील विहीर व वीजपंपाची नोंद गायब करण्याचा अफलातून प्रकार देखील प्रताप येथील महसूल विभागाने केला आहे. याप्रकरणी योग्य चौकशी करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी यांनी दिला आहे.
पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीत राहणाऱ्या नारायण जगताप (वय -८४) यांची सारोळा बु” (ता. पाचोरा) शिवारात गट. क्रं. ९७ मध्ये शेतजमीन आहे. त्यांच्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सारोळा बु” विविध कार्यकारी सोसायटीचा दोन लाख रुपये कर्जाचा बोजा असल्याची नोंद तलाठ्याकडून करण्यात आली.
त्याबाबत विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ही नोंद व बोजा कोणी बसवला? कोणत्या बँकेचे कर्ज, कोणत्या तारखेचा घेतले ? याबाबतच्या कागदपत्रांची मागणी नारायण जगताप यांनी जून २०२० मध्ये तहसीलदारांकडे केली. परंतु त्याबाबत कोणताही खुलासा आजपर्यंत करण्यात आलेला नाही. सातबारा उताऱ्यावरील दोन लाख रुपये कर्जाचा बोजा कमी करा, असा कोणताही अर्ज नारायण जगताप यांनी दिलेला नाही. परंतु जानेवारी २०२१ मध्ये सदरचा कर्जाचा बोजा कमी करण्यात आला व सातबारा उताऱ्यावरून शेतातील विहीर व त्यावरील वीजपंप याबाबतची नोंद गायब केली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचा मनस्ताप वाढला असून, त्यांनी याबाबत माहिती अधिकाराद्वारे तहसीलदार व सारोळा बु” तलाठी यांना माहिती अधिकारात अर्ज देऊन सातबारा उताऱ्यावरील दोन लाख रुपये कर्जाचा बोजा कमी कसा झाला ? सदरची रक्कम कोणी, कोणत्या बँकेत भरली? तसेच सात बारा उताऱ्यावरील शेतातील विहीर व त्यावरील वीजपंप याबाबतची नोंद कोणी व का रद्द केली? याबाबतची माहिती मागण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा अर्जही घेण्यात येत नसल्याची व्यथा नारायण जगताप यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्युजशी बोलतांना सांगितली.
आंदोलनाचा इशारा
महसूल विभागाच्या या अफलातून प्रतापामुळे मानसिक छळ व मनस्ताप वाढला आहे. याबाबत योग्य ती चौकशी कार्यवाही होऊन न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा नारायण जगताप यांनी दिला आहे.