भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त – माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

चाळीसगाव प्रतिनिधी । राज्यात १५ वर्ष पुर्वी आघाडीची सत्ता असताना अजित पवार यांनी १२/१२/२०१२ रोजी ‘महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त करू’, अशी घोषणा केली होती. मात्र, महाराष्ट्र भाजप सरकारच्या काळात लोडशेडिंग मुक्त झाला आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. जनतेच्या मनातून आघाडीचे सरकार पुर्ण उतरले असून दुराचारी, भ्रष्ट्राचारी महाविकास आघाडी सरकारचे दिवस भरले असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी, माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 

मी उर्जामंत्री असताना राज्यातील वीजबिल थकीत असणाऱ्या ४५ लाख शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत एकही लाईनमन ला जाऊ दिले नाही. शेतकऱ्यांची वीज तोडायचे पाप आम्ही केले नाही याउलट एन खरीप हंगामात देखील महाविकास आघाडी सरकारने वीज कनेक्शन कट केली. राज्यात ओबीसी, मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ या सरकारने करून ठेवला, असे माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना चाळीसगाव तालुक्यातील युवा मोर्चा वॉरीअर्स शाखा उद्घाटन, विविध आघाड्यांचे पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप निमित्ताने चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

त्यांच्यासोबत युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष व पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य तथा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रभाऊ राठोड, मार्केटचे माजी सभापती सरदारशेठ राजपूत, जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष अनुप दादा मोरे, योगेशजी मैंद, प्रदेश सचिव  विजयजी बनछोडे, हर्षलजी विभांडीक, प्रदेश सदस्य संकेत बावनकुळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे, महिला आघाडी शहराध्यक्षा सौ.संगीताताई गवळी, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी-कार्यकर्ते, भाजपा युवा मोर्चा वॉरीअर्स मोठ्या संखेने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बुथवर भाजपा युवा मोर्चाच्या ५० – ५० युवा मोर्चा वॉरीअर्स शाखांचे उद्घाटन करण्यासाठी हा राज्यस्तरीय दौरा आयोजित केला आहे. प्रत्येक शाखेतील युवकांची माहिती गोळा करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम आगामी काळात राबविण्यात येणार आहेत. सुदैवाने राज्यातील जे काही १०-१२ सक्रीय आमदार आहेत त्यातील एक आमदार मंगेश चव्हाण असून त्यांच्या सोबत युवकांना काम करता येणार असल्याने आगामी काळात तालुक्यात संघटना अजून बळकट होईल असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, संघटनेच्या जीवावर लोकप्रतिनिधी मोठा होत असतो, त्यामुळे व्यक्तिकेंद्रित राजकारण न करता संघटनेला कधीही दुय्यम वागणूक देणार नाही. राज्यातील केवळ भाजपाच नव्हे तर सर्व पक्षातील पहिली मुकबधीर आघाडी चाळीसगाव येथे स्थापन झाली आहे, युवा मोर्चाच्या युवती आघाडीची देखील आज नियुक्ती झाली त्यात काम करणाऱ्या सर्व भगिनींना विश्वास देतो की तुमचा भाऊ म्हणून मी सोबत असेल. बावनकुळे साहेब व विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या नियुक्त्या  व शाखा उद्घाटन झाल्याने हा एक सोनेरी क्षण असून निश्चितच त्यांनादेखील अभिमान वाटेल असे काम येत्या काळात पक्ष संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात उभे करू असे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले.

एकच चर्चा… युवा मोर्चा.!!!’ घोषणांच्या गजरात चाळीसगाव तालुक्यात भाजपा युवा मोर्चा वॉरीअर्स १३ शाखांचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात उद्घाटन

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे जळगाव येथून आपले कार्यक्रम आटपून येत असताना आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे, वाघळी, पातोंडा, ओझर, टाकळी प्रचा २, चाळीसगाव शहर ३, खडकी बु., तळेगाव, रोहिणी येथे युवा मोर्चाच्या १३ शाखांचे उद्घाटन करण्यात आले. ‘एकच चर्चा… युवा मोर्चा.!!!’ घोषणांच्या गजरात युवकांच्या उत्साहाला यावेळी उधान आले होते. चाळीसगाव तालुक्यात थेट प्रदेश प्रभारी व प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत प्रथमच भाजपा शाखा उद्घाटन कार्यक्रम होत असल्याने त्याची चर्चा तालुक्यात होती. आगामी काळात होणारी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शाखा उद्घाटन व नियुक्त्यांचा मोठा प्रभाव पडणार आहे.

महाराष्ट्रातील पहिली मुकबधीर आघाडी तसेच भाजपा माजी सैनिक आघाडी, युवती आघाडीसह विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांच्या प्रयत्नाने राज्यातील पहिली भाजपा मुकबधीर आघाडी चाळीसगाव तालुक्यात स्थापन झाली असून तालुकाध्यक्ष पदी ओझर येथील गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच देशसेवा करून आता तालुक्याची सेवा करणाऱ्या माजी सैनिकांची देखील आघाडी भाजपने स्थापन केली असून त्यांचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील कोदगाव व कार्यकारणीच्या नियुक्त्या करण्यात आल्या. चाळीसगाव शहर युवा मोर्चाने देखील आपल्या युवती विभाग शहराध्यक्ष नेहा दीपक पाटील व विद्यार्थी विभाग शहराध्यक्ष सिद्धांत पाटील, सोशल मिडिया विभाग शहराध्यक्ष यश सोनजे यांच्या नियुक्त्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान केल्या.

 

 

Protected Content