नगरदेवळा गावातच कचऱ्याची विल्हेवाट ; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

 

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील  नगरदेवळा गावातून जमा झालेला कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येत नसून हा कचरा मार्केट समोरील भागात टाकला जात आहे. यातच हा कचरा येणारे जाणारे पेटवून देत असल्याने यातून विषारी वायू निघून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हा कचरा गावाबाहेर टाकावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील व सागर पाटील यांनी केली आहे. 

कचरा जाळल्याने गावाच्या वातावरणात अनेक विषारी वायू, धूर पसरत आहे. यापासून ग्रामस्थांना कर्करोग, यकृताचे आजार, अस्थमा, श्वसनरोग, मेंदूविकार होण्याची दाट शक्यता आहे. कचरा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे संवेदनशील श्वसन यंत्रणेवर विशेषत: लहान मुलांच्या श्वसनावर विपरीत परिणाम होतो. त्वचा काळी पडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे याचा त्रास होत आहे. यामुळे गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य खालावू शकते. कचऱ्यात पालापाचोळा, प्लास्टिक, जुने कपडे, मेलेली जनावरे यांचा सर्वाधिक प्रमाणात समावेश राहतो. या वस्तू जाळल्याने अतिशय विषारी वायू निसर्गात पसरतात. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लवकरात हा प्रश्न मार्गी लावावा. याची कल्पना ग्रामपंचायतला देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. 

आज याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील व सागर पाटील यांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना कल्पना दिली असता किरण काटकर यांनी पाहणी केली असून लवकरच जागा बदलुन याची विल्हेवाट लावण्यात येईल आश्वासन दिले. यावेळी किरण काटकर यांच्यासह रवींद्र पाटील सागर पाटील, राजेंद्र महाजन, मधुकर पाटील, पद्माकर पवार, संतोष लोहार, मधुकर बिरारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content