मुंबई : वृत्तसंस्था । पावसाच्या पार्शवभूमीवर कोकण, गोवा, विदर्भ आणि मराठवड्यासाठी पुढील ३६ तास महत्वाचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरीत पावसामुळे धोका निर्माण झाला असून एनडीआरएफची पथकं दाखल झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची भीती आहे तर दुसरीकडे चिपळूणमध्ये २००५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. चिपळूणमध्ये घरं, बाजारपेठेत पाणी शिरलं असून दोन बोटींच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुुर करण्यात आलं आहे. याशिवाय रायगड, ठाणे येथेही पावसाने धुमाकूळ घातला आहे.
मुंबईलाही पावसाने झोडपलं असून जुलै महिन्यातील मुंबईच्या पावसाची सरासरी ८४० मिमी असताना यंदा मात्र १ जुलै ते २१ जुलै या कालावधीत सांताक्रूझ येथे १०३२.२ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. याच कालावधीत कुलाबा येथे नोंदवला गेलेला पाऊसही दीर्घकालीन सरासरीच्या जवळपास म्हणजेच ७६१.६ मिमी इतका आहे. दरम्यान गुरुवारीही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्यानं मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज आहे. आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र नंतर रेड अलर्ट देण्यात आला. मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि विदर्भातील काही ठिकाणीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.