भाजपही सोमय्या यांना गंभीरपणे घेत नाही — अनिल परब

मुंबई: वृत्तसंस्था । आम्ही सोडाच पण भाजपही सोमय्या यांना गंभीरपणे घेत नाही, अशा शब्दांत राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सोमय्या यांची खिल्ली उडवली आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर १२ हजार कोटींच्या कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचा आरोप केला सोमय्या यांचे आरोप शिवसेनेकडून फेटाळून लावण्यात आले आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५ हजार बेड्सचं रुग्णालय उभारण्याच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरूनच ५ हजार कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सांगण्यावरून महापालिका आयुक्तांनी अवघ्या ७२ तासांत एका खासगी बिल्डरची अंदाजे ५०० ते ७०० कोटी रुपये किंमतीची जागा तब्बल ३ हजार कोटींना खरेदी करण्याचा प्रस्ताव संमत केला. रुग्णालय उभारण्यासाठी ७ हजार कोटी, जमिनीसाठी ३ हजार कोटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी २ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

कोणतीच कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली नाही. मंत्रिमंडळ बैठक, आरोग्य विभागाचे अधिकारी, पालिकेचे अन्य अधिकारी आणि मित्र पक्ष या सर्वांनाच बगल देत केवळ कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर पालिका आयुक्तांनी तातडीने हा प्रस्ताव मंजूर करण्याची तयारी दाखवली, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे सरकारच्या या १२ हजार कोटींच्या हॉस्पिटल घोटाळ्याची लोकपालांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे. आपण घेतलेल्या आक्षेपामुळे या रुग्णालयाचा प्रस्ताव सध्या थांबवण्यात आला आहे, असेही सोमय्या यांचे म्हणणे आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांना याबाबत विचारले असता त्यांनी सोमय्या यांची खिल्ली उडवली. किरीट सोमय्या यांच्याकडे सध्या आरोप करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. आमचे सोडाच पण त्यांचा पक्षही त्यांना गंभीरपणे घेत नाही, असा टोलाच परब यांनी सोमय्या यांना लगावला. भाजपने प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Protected Content