बांगलादेश पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न; १४ दहशतवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा

 

ढाका : वृत्तसंस्था । बांगलादेशमधील कोर्टाने  पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या १४ दहशतावद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवाद्यांनी २००० मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

 

सुनावणीसाठी नऊ दोषींना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी हा निर्णय सुनावण्यात आला.

 

कायद्याने अडवणूक केली नाही तर फायरिंग पथकाकडून शिक्षेची अमलबाजवणी केली जाणार असल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं आहे. अन्यथा दोषींना फासावार लटकवलं जाणार आहे. बांगलादेश कायद्यांतर्गत मृत्यूदंडांच्या शिक्षेचा आढावा घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या हाय कोर्ट विभागाच्या मान्यतेनुसार दोषींना फाशी देण्यात येईल असं न्यायाधीशांनी सांगितलं आहे.

 

 

सर्व दोषी हे हरकत-उल जिहाद बांगलादेश संघटनेचे ऑपरेटिव्ह आहेत. इतर पाच दोषी फरार असून गैरहजेरीत त्यांच्यावरही खटला चालविला गेला. कायद्यानुसार राज्य-नियुक्त वकीलांनी त्यांचा बचाव केला होता. त्यांच्या अटकेनंतर किंवा आत्मसमर्पणानंतर निकालाची अमलबजावणी करण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे.

 

हरकत-उल जिहाद बांगलादेशच्या दहशतवाद्यांनी  २१ जुलै २००० रोजी गोपालगंज येथे ७४ किलो स्फोटकं लपवून ठेवत शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. शेख हसीना यांची प्रचारसभा या ठिकाणी पार पडणार होती. मात्र सुरक्षा अधिकाऱ्यांनी सभेआधीच स्फोटकांची माहिती मिळवली आणि मोठी दुर्घटना टळली.

Protected Content