मुक्ताईनगर पंकज कपले । खडसे कुटुंबातील राजकीय भिन्नतेवरून चर्चा रंगत असतांना आज ओबीसी आरक्षणावरून जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे आणि त्यांच्या भावजई खासदार रक्षा खडसे यांनी परस्पर विरोधी विचार मांडल्याने या चर्चेला नव्याने फोडणी मिळाली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्यानंतर दोन्ही पिता-पुत्र गेल्या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रवादीत गेले. तथापि, खडसेंची स्नुषा रक्षाताई खडसे या अद्यापही भाजपमध्येच आहेत. त्या आपल्या पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे एकनाथराव खडसे हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यात रोहिणी खडसे यांनी आजवर अनेकदा भाजपच्या धोरणांवर टीका केली असली तरी थेट फडणवीस यांच्यावर हल्ला केला नव्हता. आज मात्र त्यांनी ओबीसी आरक्षणावरून त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. याचा रोख फडणवीस यांनी एकनाथराव खडसे यांचा छळ करण्याकडे होता.
दरम्यान, रोहिणी खडसे यांनी हे मत मांडून काही तास होत नाही तोच त्यांच्या नणंद खासदार रक्षाताई खडसे यांनी ओबीसी आरक्षणासाठी भाजपची भूमिका मांडत यासाठी पक्ष २६ जून रोजी आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावर त्यांना रोहिणी खडसे यांच्या टिकेबाबत विचारणा करण्यात आली. याप्रसंगी रक्षाताई यांनी भाजपने ओबीसींना न्याय दिला असून यामुळेच मला खासदारकी मिळाली असून रोहिणीताईंनाही आमदारकीचे तिकिट मिळाल्याकडे लक्ष वेधून घेतले. यामुळे आता ओबीसी आरक्षणावरून नणंद-भावजईत वाद रंगल्याचे दिसून आले आहे.