व्याधीग्रस्तांना घरी जाऊन कोरोना लस देणार

 

जालना: वृत्तसंस्था । जे लोक व्याधींमुळे किंवा इतर कारणाने घरातून बाहेर पडूच शकत नाही, अशा लोकांचं घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली

 

या लोकांना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येण्याची गरज राहणार नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

 

राजेश टोपे आज जालन्यात होते. आता घराघरात जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या या मोहिमेचा लाभ सर्वांना मिळणार नाही. जे लोक घरातून बाहेर येऊ शकत नाही, अशांना घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळा प्रोटोकॉल तयार करण्यात येणार आहे. जे शारीरिक व्याधीमुळे घराबाहेर पडू शकत नाहीत, अशा लोकांच्या कुटुंबानी लेखी लिहून देणं बंधनकारक आहे.  फॅमिली डॉक्टरचे सर्टिफिकेटही देणे गरजेचे असणार आहे. तरच घरी येऊन लस दिली जाणार आहे, असं टोपे म्हणाले. घरी जाऊन लसीकरण करण्याचं हे काम टास्क फोर्सला देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

लस खरेदीसाठी ठाकरे सरकारने सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेतल्याने सरकारने हे सात हजार कोटी रुपये आता शेतकऱ्यांसाठी वापरावेत, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यावर टोपे यांनी पलटवार केला आहे. सात हजार कोटी ही तुटपुंजी रक्कम आहे. शेतकऱ्यांची आम्ही नेहमी काळजी घेत आलो आहोत. राज्य शासन जनतेच्या सेवेसाठी सदैव सज्ज आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

विविध जिल्ह्यांतील कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा यांच्या आधारे लागू करण्यात येणाऱ्या बंधनांच्या स्तरांविषयी निर्देश दिले आहेत. 10 जूनरोजी संपूर्ण राज्यात रुग्णांद्वारे वापरात असलेल्या ऑक्सिजनयुक्त खाटांची एकूण संख्या 20,697 इतकी असून ही संख्या घट दर्शवणारी आहे. ही संख्या 35,000 पेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही.

 

अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नंदूरबार, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, सिंधुदुर्ग  या जिल्ह्यांमध्ये अनलॉकची शक्यता आहे .

 

Protected Content