खासदार संजय राऊत येणार जळगाव जिल्हा दौर्‍यावर

जळगाव प्रतिनिधी । शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार संजय राऊत जळगाव जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याचे संकेत आधीपासूनच मिळाले होते. कोविडच्या आपत्तीमुळे लावलेल्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमिवर त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र ते आजपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर निघाले असून यामध्ये ते जळगाव जिल्ह्यास देखील भेट देणार आहेत.

संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये ११ जून रोजी सायंकाळी चोपडा येथे रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांची सायंकाळी पाच बैठक होणार आहे. तर शनिवार दिनांक १२ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता जळगाव येथे जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. तसेच यानंतर खासदार राऊत हे काही पदाधिकार्‍यांशी पुन्हा चर्चा करणार आहेत. पक्षाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

खासदार संजय राऊत यांच्या जिल्हा दौर्‍यात पक्ष संघटनेशी संबंधीत महत्वाच्या बैठका होणार आहेत. विशेष करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.

Protected Content