टोकियो : वृत्तसंस्था । ऑलिम्पिक परंपरेनुसार खेळात भाग घेणाऱ्या खेळाडूंना मोफत १,६०,००० कंडोमचे वाटप करण्यात येणार आहे. पण, या कंडोमच्या वापराबाबत समस्या समोर आली आहे.
यंदा जपानच्या टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकची तयारी जोरात सुरू आहे. कोरोना कालावधीत ऑलिम्पिक यशस्वीरित्या आयोजित करणे, हे आयोजक समितीसमोर मोठे आव्हान आहे.
ऑलिम्पिक आयोजन समितीने स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मोफत कंडोमच्या वापराला मनाई केली आहे. ऑलिम्पिकची आठवण म्हणून हे कंडोम घरी आपल्या देशात घेऊन जायचे असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. खेळाडूंनी आपल्या देशात गेल्यावर याचा वापर करावा, अशी आयोजन समितीची भूमिका आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने १९८८पासून खेळांदरम्यान कंडोमचे वाटप करण्याची प्रथा सुरू केली. एचआयव्ही एड्स आणि लैंगिक आजारांना आळा घालण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली. मागील ऑलिम्पिकच्या तुलनेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कमी कंडोमचे वाटप केले जाणार आहे. याआधीच्या रिओ ऑलिम्पिकच्या काळात ऑलिम्पिक समितीने ४,५०,००० कंडोमचे वाटप केले होते.
२०२१च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या जवळपास ११,००० खेळाडूंना प्रत्येकी १४ कंडोम मिळणार आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी खेळाडूंनी कमीत कमी संपर्क ठेवावा, अशी सूचना ऑलिम्पिकचे आयोजक करत आहेत. आपल्या या कार्यक्रमाची घोषणा करताना ऑलिम्पिक समितीने ३३ पानांचे एक पुस्तकदेखील प्रसिद्ध केले आहे. यात एकमेकांसोबत शारिरीक संपर्क टाळण्याविषयी सांगितले गेले आहे.