राज्यातील कोरोनाबळींचा आकडा १ लाखापुढे

 

मुंबई : वृत्तसंस्था । आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख २३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील जवळपास अर्धे मृत्यू १५ फेब्रुवारीनंतर झाले आहेत. दुसऱ्या लाटेत हे मृत्यू झाले आहेत.

 

गुरूवारी महाराष्ट्रात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूंसह कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची महाराष्ट्रातली संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. यापैकी जवळपास ५० टक्के मृत्यू तर दुसऱ्या लाटेत झाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत मागील महिन्यातील दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली आहे.

 

 

देशभरात होणाऱ्या कोरोना मृत्यूंपैकी २० टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. एकंदरीत, भारतामध्ये आजपर्यंत झालेल्या ३.४ लाख कोरोना मृत्यूंपैकी ३० टक्के राज्याचा वाटा आहे. गेल्या वर्षभरापासून हे प्रमाण स्थिर असल्याचे दिसत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मुंबईत मृतांचा आकडा १५,००० च्या जवळपास आहे तर पुण्यात ते १२,७०० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. ठाण्यात ८,००० पेक्षा जास्त आणि नागपूर ६,५०० हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.

 

देशात आजपर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जवळपास ५८ लाख लोकांना संसर्ग झाला असून १ लाखांच्या वर मृत्यूंची नोंद झाली आहे. तरीही, मृतांचा आकडा थोडा असमान आहे. देशातील रुग्णसंख्येमध्ये राज्याचा वाटा २० टक्के आणि मृत्यूंमध्ये ३० टक्के आहे.

 

पंजाबमध्ये मात्र याउलट चित्र आहे. देशातील २ टक्के रुग्ण पंजाबमध्ये आढळून आले आहेत तर एकूण मृत्यूंपैकी ४.५ टक्के मृत्यू पंजाबमध्ये झाले आहेत. पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास १५,००० मृत्यू झाले असून हे प्रमाण सर्वाधिक आहे. पंजाबमध्ये मृत्यूचे प्रमाण हे २.८८ टक्के आहे, तर सध्या भारतात एकूणच मृत्यूचे प्रमाण हे १.३१ टक्के आहे. महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण १.७३ टक्के आहे.

 

महाराष्ट्रात आतापर्यंत झालेले अर्ध्याहून अधिक मृत्यू हे आठवड्याभरापूर्वीच्या आकडेवारीतील आहेत. गेल्या २४ तासात २५ हजार ६१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १५ हजार २२९ जणांना लागण झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.७३ टक्के आहे.. राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या २ लाख ४ हजार ९७४ सक्रिय  रुग्ण आहेत.

 

दरम्यान, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मृत्यूचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे. गेल्या महिन्याभरातील रुग्णसंख्येपेक्षा दैनंदिन रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण अद्याप सारखेच आहे.

 

Protected Content