जळगाव, प्रतिनिधी । कोरोना व आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर या आदिवासी भागातील नागरीकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी आज दिले आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नवसंजीवनी योजनेची मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे पार पडली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्यात. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, आदिवासी विकास विभाग यावलच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तडवी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, भाऊसाहेब अकलाडे, तडवी आदिंसह विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळून येत असून आगामी काळात पावसाळाही सुरु होईल. याकरीता आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसे मनुष्यबळ, औषधे व इतर सोयीसुविधा उपलब्ध राहणे आवश्यक आहे. याकरीता आवश्यक ते नियोजन करावे. नवसंजीवनी योजनेतील लाभार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवावा. या भागातील नागरीकांना घर तेथे जॉबकार्ड व जॉबकार्ड तेथे काम या तत्वावर कामांचे वाटप करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या डिलीव्हरीची पूर्ण व्यवस्था होईल यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन ठेवाव्यात. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनातंर्गत लहान मुलांचे लसीकरण होईल याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील रुग्णवाहिका सुस्थितीत राहील याची दक्षता घेण्याबरोबच स्तनदा मातांना आवश्यक आहार व गरोदर मातांना मातृत्व अनुदानाचे लवकरात लवकर वाटप करण्याच्या सुचनाही त्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्यात.
या भागातील आरोग्य केंद्रात मनुष्यबळ व आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच निमड्या व देवजीरी येथील आरोग्य उपकेद्रांची इमारतीचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करुन तेथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित यंत्रणांना दिल्यात.
यावेळी उंबर्डी, लासूर, वैजापूर, जामन्या, गारडया, निमड्या या आरोग्य उपकेंद्रातील अडीअडचणी व आवश्यक सुविधा तसेच रोहयो अतंर्गत आदिवासी भागातील नागरीकांना जास्तीत जास्त कामे उपलब्ध करुन देण्याबाबत प्रतिभा शिंदे यांनी विविध सुचना मांडल्या.