कोरोनाच्या मुकाबल्यासाठी शेतकरी आंदोलकांची सज्जता

 

 

नवी दिल्ली : वृत्तासंस्था  । देशात सध्या कोरोनाच्या लाटेचा कहर  असला  तरीही दिल्लीच्या टिकरी आणि सिंघू सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी अनेक शेतकरी संघटनांच्या प्रमुखांनी पुढाकार घेत तयारी केली आहे.

 

आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना वारंवार कोरोना नियमांचं पालन कऱण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, त्यासोबतच ऑक्सिजन सिलेंडर्स, कॉन्सन्ट्रेटर्स यांचीही सोय करण्यात आलेली आहे.

 

या आंदोलनात सहभागी झालेल्या बलजीत कौर सांगतात, “आधी भाषणांमधून तीन शेतकरी कायदे यांच्याविषयीच बोललं जायचं. मात्र, आता जे कोणी भाषणासाठी येतात, मग ते शेतकरी संघटनेचे नेते जरी असतील तरी ते कोरोनाच्या अनुषंगाने काळजी घेण्याचं आवाहन करत असतात. त्याचबरोबर, मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर अशा नियमांचं पालन कऱण्याबाबत वारंवार ,सूचना करत असतात. ”

 

शेतकऱ्यांचे नेते आणि आंदोलक जगसीर सिंग सांगतात, “आम्हाला वारंवरा गरम पाणी पिण्यास सांगितलं जातं. उपवास टाळा, आपला घसा कायम ओला ठेवा अशा सूचना दिल्या जातात. त्याचबरोबर चहा करताना आलं, दालचिनी, जिरे अशा पदार्थांचा वापर करण्याचं आवाहनही केलं जातं.”

अशा सूचना दिवसातून कमीतकमी ५ ते ६ वेळा करण्यात येतात असंही त्यांनी सांगितलं.

 

“जे कोणी आजारी पडतात त्यांना तात्काळ डॉक्टरांची एक टीम तपासते आणि त्यांना कोरोनाची लक्षणं तर नाहीत ना याची खातरजमा केली जाते, असंही एका आंदोलकाने सांगितलं. त्याचबरोबर आम्ही वारंवार डास मारण्यासाठी औषधं फवारतो, सॅनिटायझर फवाारतो त्यामुळेही काही लोक आजारी पडतात”, असंही त्याने सांगितलं.

 

या आंदोलनात डॉ. दलेर सिंग मुलतानी हे सर्जन आपल्या टीमसह सेवा बजावत आहेत. ते म्हणतात, “आम्ही आंदोलकांना कोरोनाच्या प्रसाराबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर आम्ही कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करत आहोत. आम्ही आपत्कालासाठी काही ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कॉन्सन्ट्रेटर्स यांचीही सोय करुन ठेवली आहे. पण अद्याप त्यांचा वापर करण्याची वेळ आलेली नाही. सर्व आंदोलक मास्क लावत आहेत, सुरक्षित अंतराचं पालन करत आहेत.”

टिकरी सीमेवरचे एक शेतकरी नेते म्हणतात, “आमचे नेते आम्हाला आता अधिक लोक आंदोलनासाठी न आणण्याचे आवाहन करत आहे. कारण कोरोनाची ही लाट प्राणघातक ठरत आहे. याआधी आंदोलनात ५०००० हून अधिक लोक सहभागी झाले होते. मात्र, आता ९ ते १० हजारांच्या वर ही संख्या जाऊ नये यासाठी आवाहन केलं जात आहे.

Protected Content