वर्धा : वृत्तसंस्था । । महाराष्ट्रातील कोरोना चाचण्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वर्धा येथील जिल्हा रूग्णालयाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राज्यातील कोरोना चाचण्या वाढविण्याची मागणी करणारे पत्र लिहले होते. यानंतर आज वर्धा येथील दौर्यात त्यांनी पुन्हा एकदा या मागणीचा पुनरूच्चार केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. वर्ध्यात आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिनचा पुरवठा आणि मनुष्यबळ वाढवण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाशी चर्चा करून आरोग्य व्यवस्थेची माहिती घेतली.
दरम्यान, राज्यात रोज 65 हजाराच्यावर रुग्ण आढळत आहेत. मुंबईसह राज्यात कोरोना चाचण्या कमी प्रमाणात होत आहेत. मुंबईसह राज्यात कोरोनाची टेस्टिंग वाढली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून मी टेस्टिंग वाढवण्याची मागणी केली आहे. मुंबईतील मृतांच्या आकड्यांचा ताळमेळ लागत नाही. त्याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे, असं ते म्हणाले.