मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अतिशय अचूक नियोजन करून राज्यात कोरोनाची स्थिती हाताळली असून महाराष्ट्राच्या या मॉडेलचे देशाला अनुकरण करावे लागणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री ज्याप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत, त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले. त्यामुळे राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. विरोधकांनी आता टीका करणे बंद करावे.
गेल्या पाच-दहा वर्षात देश किती पुढे गेला हे माहिती नाही. पण कोरोना संकटामुळे देश 20 वर्षे मागे गेला आहे. देशातील अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या असून आता अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले होते. या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहेत. राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.