जळगाव प्रतिनिधी । कुटुंब घरात झोपलेले असतांना घराचा खिडकीतून आत हात टाकत घरातून तीन मोबाईलसह ८ हजारांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना ५ डिसेंबर २०२० रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील पोलिसांनी वसीम कदिर पटेल (वय २१) रा. मास्टर कॉलनी या संशयिताला २२ मार्च रोजी रात्री १० वाजता राहत्या घरातून अटक केली आहे.
शहरातील मास्टर कॉलनीतील बरकाती चौकातील रहिवासी जावेद नबी काकर हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. ५ डिसेंबर रोजी ते झोपलेले असतांना संशयित आरोपीने त्यांच्या घराच्या खिडकीतून हात टाकून दरवाजा उघडला. घरात प्रवेश केल्यानंतर घरात ठेवलेली ८ हजारांची रोख रक्कम व तीन मोबाईल असा एकूण २१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीचा गुन्हा घडल्यापासून संयित आरोपी वसीम कदिर पटेल (वय २१) हा सूरत व मालेगाव येथे फरार होता. तो जळगावात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सूधीर साळवे, योगेश बारी यांचे पथक तयार केले. या पथकाने सराईत गुन्हेगार वसीम पटेल याला सोमवारी रात्री ९ वाजता अटक केली.
सराईत गुन्हेगार वसीम पटेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यात आहे. या घटनेतील ३ हजार ४०० रुपये किंमतीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. त्याला आज न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्याला २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.