भंडारा: वृत्तसंस्था । पवनी तालुक्यातील भेंडाळा गावात पाणीपूरी व नूडल्स खाल्ल्याने विषबाधा झाल्यानं 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून 40 मुलं आणि नागरिकांना उलटी, ताप व पोट दुखीचा त्रास होत आहे
राखी सतीबावणे असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. आरोग्य विभागाचं पथक गावामध्ये दाखल झालं आहे.
पवनी तालुक्यातील भेंडाळा गावात 40 लोकांना विषबाधा झाल्याची शक्यता आहे. राखी सतीबावणे या 12 वर्षीय मुलीचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. रविवारी बाजारामध्ये नूडल्स खाल्याने उलट्या आणि हगवणीचा त्रास सुरू झाला होता, त्यामुळे हा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबातील लोकांनी केला आहे. गावातील जवळ पास 40 लोकांना ही विषबाधा झाली असून काही लोकांना सध्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल केले आहे.
भेंडाळा गावात रविवारी आठवडी बाजार होता.आठवडी बाजार मध्ये पाणीपुरी आणि चायनीजचे ठेले लागले होते. ज्या लोकांनी पाणीपुरी आणि नूडल्स खाल्ले अशा सर्व लोकांना सोमवारी त्याचा त्रास जाणवू लागला. रामदास सतीबावने यांच्या कुटुंबातील मुलांनी सुद्धा हे नूडस खाल्ले होते. त्यानंतर सोमवारपासून या मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यातच मंगळवारी राखीची प्रकृती गंभीर झाल्याने तिच्या वडिलांनी तिला पवनी येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
राखीच्या मृत्यूची बातमी गावात पसरली आणि हळूहळू ही बाब समोर आली. गावातील बऱ्याच लोकांना सध्या उलटी आणि हगवणीचा त्रास सुरू असल्याने त्यांच्यावर घरी किंवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, नेमका किती लोकांना याचा त्रास होतो आहे. हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. मुलीच्या मृत्यूनंतर गावात विशबाधा झाल्याची माहिती पोलिस पाटलांनी आरोग्य यंत्रणेला दिल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जाग झाली आणि गावात दाखल झाली. ज्यांना उपचाराची गरज आहे त्या सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे.