मुंबई: वृत्तसंस्था । वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.
अंबानी स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे.शरद पवार साधारण 12 वाजण्याच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊणतास चर्चा सुरु होती. या भेटीत सचिन वाझे आणि एनआयएचा तपास या दोन विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आता दुपारी चार वाजता शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचे कारण मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा असे सांगितले असले तरी या बैठकीत सचिन वाझे प्रकरणात डॅमेज कंट्रोल कशाप्रकारे करायचे, याविषयी चर्चा होणार असल्याचे कळते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे.
दुसऱ्या बाजूला शिवसेना अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही अल्याची माहिती आहे. परमबीर सिंह यांना जो न्याय लावण्यात आला तोच अनिल देशमुख यांना लावण्यात यावा. हे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे सरकारमधील काही नेत्याचे म्हणणे आहे.
अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरु असलेल्या चौकशीत सचिन वाझे यांनी मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता या बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीची तयारी सुरु आहे. त्यासाठी एनआयएच्या गोटात वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत.
तीन वरिष्ठ अधिकारी सोमवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत. हे अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचे असल्याची माहिती मिळत आहे. सध्या एनआयएचे अधिकारी विक्रम खलाटे यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण तपास सुरु आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. चौकशीदरम्यान सचिन वाझे यांनी मुंबई पोलीस दलातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. हा अधिकारी अत्यंत मोठ्या पदावर असल्यामुळे विक्रम खलाटे यांच्यावर चौकशी करताना दडपण येऊ शकते. त्यामुळे आणखी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.