सचिन वाझे निलंबित

 

मुंबई : वृत्तसंस्था । मनसुख हिरेन मृत्यू गुन्ह्यात  वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे.

वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सध्या राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या  कोठडीत आहेत. त्यांना शनिवारी अटक करण्यात आली होती. रविवारी विशेष न्यायालयात हजर करून NIA ने 25 मार्चपर्यंत त्यांचा रिमांड मिळवला होता. 

सचिन वाझे हे सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते.  आता पुढच्या काही दिवसांत एनआयए सचिन वाझे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर काढणार, हे पाहावे लागेल. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात  आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी पार्क केल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला होता. त्यानंतर मागून एक इनोव्हा कार आली त्यामध्ये बसून तो निघून गेला होता. 

स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात.  NIAच्या हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

 आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा आरोप केला होता. आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Protected Content