बीजिंग : वृत्तसंस्था । डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावरून पायउतार होताच चीननं ट्रम्प यांच्या टीममधील २८ जणांना मोठा झटका दिला. चीननं २८ जणांसाठी चीनने द्वार बंद केले असून, त्यांच्यावर चीनसह हॉगकाँग आणि मकाऊमध्येही बंदी घालण्यात आली आहे.
कोरोनाच्या उद्रेकानंतर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी चीनवर आरोपांची चिखलफेक केली होती. चीनला आर्थिक झळ पोहोचवण्याचेही प्रयत्न ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आले होते.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. काही वर्षांपासून अमेरिकेत काही चीनविरोधी स्वार्थी नेत्यांनी आपल्या राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी चीनविरोधात पूर्वग्रह दूषितपणातून अमेरिका आणि चीनमधील नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष केलं. अमेरिकेतील नेत्यांनी नियोजनबद्धरीत्या अशी पावलं उचलली ज्यामुळे चीनच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप होत होता. या पावलांमुळे चिनी नागरिक अपमानित झाले आणि अमेरिका-चीन संबंधांचं नुकसानही झालं. चीन सरकार देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि हितांचं रक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असं सांगत चीनने ट्रम्प यांच्या टीममधील २८ जणांवर बंदी घातली आहे.
चीनने अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॅम्पिओ, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉर्बट ब्रायन आणि जॉन बॉल्टन, माजी आरोग्य सचिव अॅलेक्स अझर, अमेरिकेचे माजी उच्चायुक्त केली क्राफ्ट, ट्रम्प यांच्या वर्तुळातील स्टीव्ह बॅनॉन यांच्यासह २८ जणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे २८ जणांना चीनसह हॉगकाँग आणि मकाऊमध्ये प्रवेश करता येणार नाही. महत्त्वाचं म्हणजे नेते आणि अधिकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनाही चीननं दरवाजे बंद केले आहेत. बंदी घातलेल्या या २८ जणांना चीनसोबत व्यापार करण्यावरही बंदी घातली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ यांनी जाता जाताही चीनवर टीका करताना उइगर मुस्लिमांचा नरसंहार सुरू असल्याचा दावा केला होता. “चीनने उइगर मुस्लिमांचा छळ करुन नरसंहार केला आहे. मला वाटत चीनकडून हा नरसंहार अजूनही सुरू आहे. आपण हे बघू शकतो की, चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचं सरकार सुनियोजितपणे उइगर मुस्लिमांना उद्ध्वस्त करत आहे,” असं त्यांनी म्हटलं होत.