आसाममध्ये कोरोना लसीचे १ हजार डोस थिजून खराब

 

गुवाहाटी : वृत्तसंस्था । आसाम सरकारच्या आरोग्य विभागानं खराब झालेले कोरोना लसीचे १००० डोस तपासणीसाठी पुन्हा लॅबकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे लसीचे डोस ‘सिल्चर मेडिकल कॉलेज’च्या ‘व्हॅक्सिन स्टोअरेज युनिट’मध्ये ठेवण्यात आले होते. हे सगळे डोस थिजलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर लस खराब होऊन बिनकामाची झाल्याची शंका डॉक्टरांनी व्यक्त केलीय.

 

सदोष तापमान नियंत्रण किंवा साठवणुकीतील चुकीमुळे लस खराब होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सिल्चर मेडिकल कॉलेजला एक नोटीसही धाडण्यात आली आहे. ‘सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’च्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या चुकीच्या व्यवस्थापनासाठी सिल्चरला ही नोटीस धाडण्यात आल्याचं समजतंय.

संबंधित लसीचे डोस खराब झाले आहेत किंवा नाही, याबद्दल अद्याप पक्की खात्री झालेली नाही. तपासणीसाठी ते लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच याबद्दल अधिक माहिती देता येईल, असं आरोग्य विभागानं म्हटलंय.

१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झालीय. त्यानंतर, लसीच्या चुकीच्या व्यवस्थापनाबद्दलचं हे पहिलंच प्रकरण उजेडात आलंय. लसीकरणासाठी सध्या सीरम इन्टिट्युटच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसींचा वापर केला जातोय.

Protected Content