जळगाव प्रतिनिधी । एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात हायटेक रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन शास्त्रज्ञ प्रमोद बोरोले यांच्याहस्ते पार पडले. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एस. वाणी, उपप्राचार्य डॉ.एस.पी. शेखावत, ई ॲण्ड टी.सी. विभागप्रमुख, डॉ. शेखर सुरळकर, डॉ.पी.एच. झोपे, डॉ. पी.जे. शाह, डॉ.पी.व्ही. ठाकरे, डॉ. एम.पी. देशमुख, डॉ. व्ही.एम. देशमुख, प्रा. एन.एम. काझी, प्रा. अमोल वाणी, प्रा. अतुल करोडे, प्रा. सुरेंद्र रामटेके, प्रा. सुनील खोडे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रमोद बोरोले यांनी एस.एस.बी.टी.च्या ई ॲण्ड टी. सी. विभागांतर्गत येणाऱ्या नवीन तंत्रज्ञान व आधुनिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोबोटिक्सचे ज्ञान ही काळाची गरज आहे. ज्यामुळे विद्यार्थी नवनवीन प्रकल्प व कल्पना ह्या लॅबद्वारे वृद्धिंगत करून त्यांना एम्बेडेड सिस्टीम, रोबोटिक, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या तंत्रज्ञानामध्ये त्यांची संशोधक वृत्ती वाढून त्यांना व्यवसायाची नवीन संधी उपलब्ध होऊ शकते व करियरच्या वेगवेगळ्या वाटा सुद्धा मिळतील. तसेच ई. अँड टी. सी. चे इंजिनीअर्स नवीन उद्योजक सुद्धा बनू शकतात असे गौरवोद्गार काढले. त्याबरोबर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात वेगाने होणाऱ्या बदलांबद्दल सविस्तर माहिती देऊन यापुढेही इलेकट्रोनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनीअर्सला सर्वोत्तम संधी मिळणार आहे; त्यामुळेच यावर्षी इंजिनीअरिंगला ऍडमिशन घेण्याऱ्या इच्छुक विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा कल सर्वात जास्त ई. अँड टी. सी. च्या हायटेक रोबोटिक्स लॅबमुळे व अनुभवी उच्च विद्याविभूषित प्राध्यापकांमुळे विद्यार्थ्यांना रोबोटिक्स व कोडिंगचे ज्ञान प्राप्त होईल व निश्चितच येणाऱ्या मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता या सारख्या क्षेत्रात तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
ई. अँड टी. सी. विभागाने आय. आय. टी., मुंबई यांच्या सहकार्याने ई यंत्र रोबोटिक्स लॅबची स्थापना केली आहे. या अंतर्गत ई यंत्र लॅब सेटअप इनिशिएटिव्ह (LSI) च्या द्वारे प्राध्यापक व सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट बेस लर्निंग ही सुविधा उपलब्ध होणार आहे व त्यासाठी आय. आय. टी., मुंबईचे मार्गदर्शन लाभणार आहे. याकरिता ई. अँड टी. सी. विभागातून प्रा. अमोल वाणी व डॉ. पी. एच. झोपे, यांनी ई यंत्राचे कार्यशाळा अंतर्गत आय. आय. टी., मुंबई येथे यशस्वीरीत्या प्रशिक्षण घेऊन तीन महिन्यांचे टास्क बेस ट्रेनिंग (TBT-2000) पूर्ण केले. या प्रशिक्षणावर आधारित नॅशनल लेवल स्पर्धा परीक्षेत संपूर्ण भारतातून सहभागी झालेल्या मोजक्या कॉलेजेसना “ए” ग्रेड मिळाले. त्यामध्ये क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रात एस. एस. बी. टी. अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकमेव आहे. रोबोटिक्ससाठी लागणारे एन. पी. टी. ई. एल. चे मायक्रो प्रोसेसर व मायक्रो कंट्रोलरचे सर्टिफिकेट प्रा. डॉ. पी. एच. झोपे यांना मिळालेले आहे.
ई. अँड टी. सी. विभागात क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत “रोबोटिक्स आणि ऑटोमेशन” हा करियर ओरिएंटेड सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. त्याला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. या कोर्समुळे सुद्धा उ. म. वी. संलग्नित कॉलेज मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
एस. एस. बी. टी. च्या रोबोटिक्स लॅब ला आय. आय. टी., मुंबईच्या विद्यमाने “फायरबर्ड – 5” रोबोटिक किट प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांना ई यंत्र आयडीयाज कॉम्पिटिशन (e-YIC) सारख्या विविध स्पर्धेत सहभाग नोंदविता येईल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी यांनी केले. हायटेक रोबोटिक्स लॅब मुळे विद्यार्थ्यांना इंटर डिसिप्लिनरी कौशल्य विकसित होऊन येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानासाठी भक्कम व पूर्णपणे विकसित होऊन व नवनवीन स्टार्टअपसाठी सक्षमपणे तयार करता येईल. रोबोटिक्स लॅबच्या स्थापनेमुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी निर्माण होतील असे मनोगत उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत यांनी केले. सरते शेवटी ई अँड टी. सी. विभागप्रमुख, डॉ. शेखर सुरळकर यांनी रोबोटिक्स लॅबचे महत्व विशद केले व सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.