नवी दिल्ली : वृत्तसंस्था| “३० डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. तर सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावून, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊ, अशी हमी शरद पवार यांनी दिल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं.
नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ३४ दिवस आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी मुक्काम ठोकला आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. ३० डिसेंबर अर्थात उद्या पुन्हा एकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलक शेतकऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांची भेट घेतली.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. उद्या चर्चेची सातवी फेरी पार पडणार आहे. तर कायदे मागे घेण्याविषयी आणि स्वामिनाथ आयोगाच्या अहवालावरच चर्चा केली जाईल, असं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. उद्या होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलन शेतकऱ्यांनी आज शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली.
नव्या कृषी कायद्यांसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्याच्या शेतकरी संघटनांच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत, केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना बुधवारी (३० डिसेंबर) दुपारी २ वाजता बैठकीला बोलावले आहे. केंद्रीय कृषी खात्याचे सचिव संजय अग्रवाल यांनी शेतकरी संघटनांना चर्चेचे निमंत्रण पत्र दिले आहे. शेतकरी संघटनांच्या चर्चा प्रस्तावाच्या अनुषंगाने कृषी सचिव म्हणाले, ‘‘स्पष्ट हेतू आणि मोकळ्या मनाने सर्व संबंधित प्रश्नांवर तर्कसंगत तोडगा काढण्यास सरकारही कटिबद्ध आहे.’’
अनेक राज्यांमध्ये राजभवनाला घेराव घालण्याचे नियोजन त्या त्या राज्यांतील शेतकरी संघटनांनी केले आहे. पाटणा, तंजावर, हैदराबाद येथे बुधवारी मोच्रे काढण्यात येणार आहेत. नववर्षदिनी शेतकऱ्यांच्या संघर्षांला पाठिंबा देण्यासाठी जागोजागी शपथ ग्रहणाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली.