फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या फरार नववधूला अटक

जळगाव प्रतिनिधी । विवाह करण्यासाठी १ लाख रूपयांत फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार नववधूला शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यापुर्वी दोन महिलांना न्यायालयीन कोठडीत आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील एमआयडीसीतील चटई कंपनीत काम करणारा कैलास संतोष चवरे रा. सामसोद ता.जामनेर हा जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील आपल्या बहिणीकडे गेल्या १२ वर्षांपासून राहत होता. चार वर्षांपुर्वी संतोष याचा घटस्पोट झालेला आहे. दरम्यान, दुसरा विवाह करण्यासाठी आई, बहिण आणि मेहुणे यांची मुलगी शोधण्याचे काम सुरू होते. जळगाव शहरातील शनिमंदीराजवळ राहणारी लिलबाई रामनारायण जोशी रा. शनीपेठ मंदीराजवळ हिने मलकापूर येथील लग्न जुळविणारी उज्वलाबाई उर्फ संगिताबाई रमेश पाटील (वय-३७) रा. कालिंकामाता मंदीराजवळ यांनी १ लाख रूपये घेवून ३० जुलै रोजी सकाळी मलकापूर येथील उज्वला गाढे (वय-१८) या मुलीशी लग्न लावून दिले. त्याच ठिकाणी कैलास याच्या नातेवाईकांनी ४० हजार आणि ६० हजार असे दोन टप्प्यात १ लाख रूपये भाभी आणि संगिताबाई यांना दिले. दरम्यान दुसऱ्या दिवशी ३१ जुलै रोजी नववधु उज्वला गाढे (वय-१८) कुसुंबा येथे असतांना सकाळी ११ वाजता कैलासचा मोबाईल घेवून पसार झाली. नववधूने पळ काढल्याचे लक्षात आल्यानंतर गावात राहणारी लिलाबाई उर्फ भाभी हिच्याकडे येवून फसवणूक केल्याचे सांगत कैलास याने दिलेले १ लाख रूपये परत कर असे सांगितले. नाहीतर आपल्या जीवाचे बरेवाईट करून घेईल असे सांगितले. दरम्यान, कोणत्याही परिस्थिती तुला पैसे मिळणार नाही, तुला जे करायचे आहे ते कर असे लिलाबाई हिने सांगितल्यानंतर कैलासने ७ ऑगस्ट रोजी नैराश्येतून शनीमंदीराजवळील पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या ओट्यावर विषारी औषध घेवून आत्महत्या केली. दरम्यान याप्रकरणी २८ ऑगस्ट रोजी मयत कैलास चवरे यांचे मेहुणे संतोष पाटील (वय-३२) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात नववधू उज्वला गाढे हिच्यासह लिलाबाई उर्फ भाभी, संगिताबाई उर्फ उज्जवलाबाई यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शनीपेठ पोलीसांनी लिलाबाई उर्फ भाभी, संगिताबाई उर्फ उज्जवलाबाई यांना ७ सप्टेंबर २०२० रोजी अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील फरार असलेली नवरी उज्वला गाढे ही तिच्या दुसऱ्या नवऱ्यासोबत रांजणगाव पुणे येथे असल्याची माहिती शनीपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, महिला पोलीस कर्मचारी अभिलाषा मनोरे, रविंद्र पवार, अनिल कांबळे यांनी रांजणगाव पुणे येथून संशयित आरोपी व गुन्ह्यातील फरार नवरी उज्जवला गाढे ही ताब्यात घेतले. आज जळगाव न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content