सरकारला ‘नापसंत’ व्यक्तींना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं — अमर्त्य सेन

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नोबल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी देशात विरोध आणि चर्चेचं स्थान ‘मर्यादित’ झाल्याचं सांगत चिंता व्यक्त केलीय. ‘ज्या व्यक्ती सरकारला पसंत नाहीत अशा व्यक्तींना ते दहशतवादी घोषित करू शकतात व त्यांना कैदेतही टाकू शकतात असेही ते म्हणाले

आंदोलन व स्वतंत्र विचार-विनिमयाच्या वेळाही संक्षिप्त केल्या जातात किंवा संपुष्टात आणण्यात येतात. कन्हैया कुमार, खालिद किंवा सेहला रशीद यांसारख्या तरुण नेत्यांना शत्रुप्रमाणे वागणूक दिली जाते’ अशी टीका अमर्त्य सेन यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केलीय.

८७ वर्षीय अमर्त्य सेन सध्या हार्वर्ड आंतरराष्ट्रीय विद्यापीठात प्राध्यापक आहेत. अमर्त्य सेनं यांनी एका मुलाखतीत आपलं म्हणणं मांडलंय. विरोधकांवर ‘मनमानी’ पद्धतीने देशद्रोहाचे आरोप ठेवून त्यांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय तुरुंगात डांबण्यात येत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

अमर्त्य सेन यांनी यावेळी केंद्रानं लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थनही केलंय. या कायद्यांवर चर्चा आणि समिक्षा करण्यासाठी मजबूत आधार असल्याचंही त्यांनी आपल्या लिखाणात नमूद केलंय. कन्हैया, खालिद, शेहला यांसारख्या दूरदृष्टी असणाऱ्या आणि शांतिपूर्ण – अहिंसक पद्धतीचा वापर करणाऱ्या नेत्यांच्या नेतृत्वगुणांना योग्यरितीनं न वापरता त्यांना शत्रुप्रमाणे वागणूक दिली जात आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

उल्लेखनीय म्हणजे, नुकतीच विश्व भारती विद्यापीठानं शिक्षण मंत्रालयाला जमिनीवर अतिक्रमण करणारी एक यादी धाडलीय. या यादीत प्रोफेसर अमर्त्य सेन यांच्या नावाचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, विश्व भारतीकडून सेन यांच्या दिवंगत वडिलांना शांति निकेतन स्थित जमीन कायदेशीररित्या भाडेतत्वावर १२५ डिसीमल जमीन देण्यात आले होती. परंतु, त्याव्यतिरिक्त १३ डेसिमल जमिनीवरही सेन यांच्याकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप विद्यापीठाकडून करण्यात आलाय. परंतु, अमर्त्य सेन यांनी मात्र विद्यापीठाचा हा आरोप फेटाळून लावलाय.

जमिनीच्या वादात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमर्त्य सेन यांचं समर्थन करतानाच त्यांच्यावर केले जाणारे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगितलंय. केंद्र सरकारच्या विरोधी विचार मांडल्यामुळेच अमर्त्य सेन यांच्यावर निशाणा साधला जात असल्याचं ममता बॅनर्ज यांनी म्हटलंय. अमर्त्य सेन यांचे विचार केंद्र सरकारच्या विरोधात असल्यानं भाजपकडून त्यांना निशाण्यावर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं त्या म्हणाल्या .

 

Protected Content