जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक अल्पसंख्याक दिनानिमित्त आज प्राथमिक स्वरूपात जळगाव मायनॉरिटी राइट्स फोरमची स्थापना झाल्याची आज १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घोषणा करण्यात आली असून फोरमच्या विविध मागण्यांसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी अल्पसंख्यांक दिनाचे औचित्य साधून सहाही धर्माचे प्रतिनिधी यांना आमंत्रित केले व सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आपल्या भारतीय घटनेने दिलेल्या अधिकाराबाबत व खास करून घटनेतील २५ ते ३० कलमाची माहिती विशद करून अल्पसंख्यांक समाजाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी बौद्ध समाजाचे हरिश्चंद्र सोनवणे यांनी सूचना मांडली की जळगावात अल्पसंख्यांक हक्क मंचाची स्थापना करण्यात यावी त्यांच्या या प्रस्तावास शीख समाजाचे जगजीद काबरा व मुस्लिम समाजाचे मुफ्ती हारून यांनी अनुमोदन दिले. यावेळी प्राथमिक स्वरूपात जळगाव मायनॉरिटी राइट्स फोरम ची स्थापना झाल्याची घोषणा ख्रिश्चन समाजाचे एस. एल. रॉस व शीख समाजाचे कमल अरोरा यांनी केली.
नव्याने स्थापन झालेल्या फोरम ने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले सदर निवेदनात माननीय राष्ट्रपती यांना संबोधून अल्पसंख्यांक अधिकार दिवस अंतर्गत सर्व सुविधा त्यात प्रामुख्याने शैक्षणिक ,आर्थिक व विकसनशील योजना ची अंमलबजावणी करण्यात यावी ,ज्या अल्पसंख्यांक संस्थांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना त्वरित सहाय्य उपलब्ध करून द्यावे ,पंतप्रधान यांच्या १५ सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी, अल्पसंख्यांक समाजातील वस्त्यांमध्ये गुणात्मक व तांत्रिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी, आरोग्य व वैद्यकीय सेवा वस्तीमध्ये उपलब्ध करून द्याव्या, झोपडपट्टी भागात दिल्ली सरकारने केलेल्या मोहल्ला क्लीनिक,पी एच सी व स्वास्थ्य केंद्र उघडायला पाहिजे, तसेच अल्पसंख्याक शाळांना दर्जा देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन पारशी समाजाचे जिओ दरबारी यांच्या हस्ते देण्यात आले . यावेळी मुफ्ती हारून नदवी, हरिश्चंद्र सोनवणे, जगदीद छाबरा, अजय राखेचा, जिओ दरबारी,कमल अरोरा यांची उपस्थिती होती.